Multan Sultans vs Lahore Qalandars PSL FINAL Highlights: लाहोर कलंदरने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीगचे (PSL 2023 Winner) विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (१८ मार्च) गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात लाहोरने मुलतान सुलतानचा अवघ्या एका धावेने पराभव केला. लाहोरच्या विजयाचा नायक कर्णधार शाहीन आफ्रिदी ठरला, त्याने प्रथम फलंदाजीत (नाबाद ४४) आणि नंतर गोलंदाजीमध्ये ४ विकेट्स घेतल्या.
गेल्या वर्षीही लाहोरने मुलतानला हरवून ट्रॉफीवर कब्जा केला होता. शाहीन आफ्रिदीला सामनावीर आणि इहसानुल्लाला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
हा अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. शेवटच्या २ षटकात लाहोर कलंदरला विजयासाठी ३५ धावांची गरज होती. हरीस रौफच्या १९व्या षटकात खुशदिल शाह आणि अब्बास आफ्रिदी यांनी मिळून २२ धावा केल्या, मात्र जमान खानच्या शेवटच्या षटकात दोन्ही फलंदाजांना अवघ्या १३ धावाच करता आल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर मुलतानला विजयासाठी चौकार हवा होता, पण शेवटच्या चेंडूवर केवळ २ धावा आल्या.
शेवटच्या दोन षटकाय काय घडलं?
१८.१ षटके - षटकार
१८.२ षटके - १ धाव
१८.३ षटके - षटकार
१८.४ षटके - चौकार
१८.५ षटके - चौकार
१८.६ षटके - १ धाव
अशा प्रकारे १९व्या षटकांत २२ धावा आल्या.
१९.१ षटके - २ धावा
१९.२ षटके - १ धाव (लेग बाय)
१९.३ षटके - डॉट बॉल
१९.४ षटके - २ धावा (बाय)
१९.५ षटके - चौकार
१९.६ षटके - २ धावा + विकेट (खुशदिल शाह)
शाहीनची वेगवान खेळी
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या लाहोर कलंदरने चांगली सुरुवात केली आणि मिर्झा बेगने (३०) फखर जमानसोबत पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मिर्झा बेग बाद झाल्यानंतर फखर झमान (३९) आणि अब्दुल्ला शफीक (६५) यांनी आघाडी घेत दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली.
मात्र, यानंतर लाहोर संघाला गळती लागली. त्यांनी १५ षटकात ११२ धावांच्या स्कोअरवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र यानंतर कर्णधार शाहीन आफ्रिदीने १५ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा ठोकल्या आणि लाहोरला २०० चा आकडा गाठून दिला.
त्यानंतर, २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान्सची सुरुवात चांगली झाली. त्यांनी पहिल्या ६ षटकात ७२ धावा ठोकल्या. रिलो रोसो (५२) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान क्रीजवर होते. त्यांनी १० षटकांत संघाची धावसंख्या १०० धावांपर्यंत पोहोचवली होती. सामना मुलतानच्या हातात होता, मात्र येथून राशिद खानने दोन्ही खेळाडूंना बाद करून सामना फिरवला.
रिले रोसोने ५२ आणि रिझवानने ३४ धावा केल्या. यानंतर शाहीन आफ्रिदीने झटपट ४ फलंदाजांना तंबूत पाठवत मुलतानची धावसंख्या १८ षटकांत ७ गडी बाद १६६ अशी केली. त्यानंतर खुशदिल शाह (२५) आणि अब्बास आफ्रिदी (नाबाद १७) यांनी मुलतानला सामना जिंकून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त धावफलक:
लाहोर कलंदर: २००/६ (अब्दुल्ला शफीक ६५, शाहीन आफ्रिदी ४४*, उस्मा मीर - ३ विकेट)
मुलतान सुलतान: १९९/८ (रिले रोसो ५२, शाहीन आफ्रिदी - ४ विकेट)
पाकिस्तान सुपर लीग आतापर्यंत विजेते
२०१६- इस्लामाबाद युनायटेड
२०१७ - पेशावर झल्मी
२०१८- इस्लामाबाद युनायटेड
२०१९- क्वेटा ग्लॅडिएटर्स
२०२०- कराची किंग्ज
२०२१- मुलतान सुलतान
२०२२- लाहोर कलंदर्स
२०२३ - लाहोर कलंदर्स