मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PSL 2023 मध्ये हे चाललंय तरी काय? ४० षटके ५१५ धावा, ३३ षटकार… एकाच सामन्यात विक्रमांचा पाऊस

PSL 2023 मध्ये हे चाललंय तरी काय? ४० षटके ५१५ धावा, ३३ षटकार… एकाच सामन्यात विक्रमांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 12, 2023 10:41 AM IST

quetta gladiators vs multan sultans most runs in t20 match : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुलतान सुलतान यांच्यातील सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला आहे. मुलतान सुल्तान्सचा फलंदाज उस्मान खानने (usman khan century) ३६ चेंडूत शतक झळकावले, तर अब्बास आफ्रिदीने (abbas afridi psl 2023 hatrick) हॅटट्रिक घेतली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून पाचशेहून अधिक धावा केल्या, हा विश्वविक्रम आहे.

quetta gladiators vs multan sultans HIGHLIGHTS PSL 2023
quetta gladiators vs multan sultans HIGHLIGHTS PSL 2023

quetta gladiators vs multan sultans PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग (PSL 2023) चा २८वा सामना (११ मार्च) मुलतान सुलतान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झाला. रावळपिंडीतील पिंडी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धावांचा तुफान पाऊस पडला. मुलतान सुलतान्सने २० षटकात ३ गडी गमावून तब्बल २६२ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात क्वेटाच्या संघानेही पलटवार करत ८ गड्यांच्या मोबदल्यात २५३ धावा चोपल्या. त्यांचा अवघ्या ९ धावांनी पराभव झाला.

म्हणजेच या सामन्यात मुलतान सुलतान्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्सने एकूण ५१५ धावांचा पाऊस पाडला. यापूर्वी एका टी-२० सामन्यात एवढ्या धावा कधीच झाल्या नव्हत्या. सोबतच धावांचा पाठलाग करताना एखाद्या संघाने टी-20 क्रिकेटमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला हे देखील प्रथमच घडले आहे.

मुल्तानच्या उस्मान खानने ३६ चेंडूत शतक झळकावले

या सामन्यात क्वेटाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. यानंतर मुल्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि उस्मान खान यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. उस्मान आणि रिझवान यांनी अवघ्या १० षटकात १५७ धावांची तुफानी भागीदारी केली. यादरम्यान उस्मान खानने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावले. PSLच्या इतिहासातील हे सर्वात जलद शतक ठरले. उस्मान खानने त्याच्याच संघातील खेळाडू रिले रोसोचा विक्रम मोडीत काढला, ज्याने एक दिवस आधी पेशावर जाल्मीविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते.

उस्मान खानने २७९.७च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ४३ चेंडूत १२० धावा ठोकल्या, ज्यात १२ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. तर रिझवानने २९ चेंडूत ५५ धावा केल्या. रिझवानने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले. नंतर टीम डेव्हिड (नाबाद ४३) आणि किरॉन पोलार्ड (नाबाद २३) यांनीही आतिशीची फलंदाजी करताना मुलतानला विक्रमी २६२ धावांपर्यंत नेले.

 तर या सामन्यात क्वेटाच्या कैस अहमदने ४ षटकात एकूण ७७ धावा दिल्या. तो आता पीएसएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.

२६२ ही पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी इस्लामाबाद युनायटेडने २०२१ मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध २ बाद २४७ केल्या होत्या. 

मुलतानच्या अब्बास आफ्रिदीची हॅटट्रिक

क्वेटा ग्लॅडिएट्सकडून ओमर युसूफने सर्वाधिक ६७ आणि इफ्तिखार अहमदने ५३ धावा केल्या. मुलतान सुलतान्सकडून अब्बास आफ्रिदीने शानदार गोलंदाजी करत ४७ धावांत ५ बळी घेतले. यादरम्यान अब्बास आफ्रिदीने मोहम्मद नवाज, उम्मेद आसिफ आणि उमर अकमल यांना पायचीत करत हॅटट्रिक घेतली. 

मुलतान सुलतानच्या डावात १७ षटकार आणि क्वेटा ग्लॅडिएट्सच्या डावात १६ षटकार आले. 

या विजयासह मुलतान सुलतानने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे, तर क्वेटा ग्लॅडिएटर्सचा प्रवास संपुष्टात आला आहे.

सामन्यात हे रेकॉर्ड झाले

T20 सामन्यात सर्वाधिक धावा - ५१५ धावा (क्वेटा ग्लॅडिएटर्स + मुलतान सुलतान्स)

पीएसएल सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाज – कैस अहमद (२/७७)

PSL सर्वोच्च धावसंख्या - २६२ धावा (मुलतान सुलतान्स)

पीएसएलचे सर्वात जलद शतक - उस्मान खान (३६ चेंडू)

T20 मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या - २५३ धावा (क्वेटा ग्लॅडिएटर्स)

WhatsApp channel