प्रो कबड्डी लीग २०२४ चा पाचवा सामना आज (२० ऑक्टोबर) जयपूर पिंक पँथर्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या गचीबावली इनडोअर स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय थरारक होता. या सामन्यात जयपूरने बंगालचा ३९-३४ असा रोमहर्षकरित्या पराभव केला.
आजच्या सामन्यात रेड मशीन म्हणून ओळखला जाणारा अर्जुन देसवाल (१५ गुण) याने जबरदस्त कामगिरी केली. तो जयपूरच्या विजयाचा हिरो ठरला.
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात बंगालकडून नितीन धनखरने (१३ गुण) चमकदार कामगिरी केली. मनिंदर सिंगने ८ गुण केले तर फजल अत्राचलीने हाय-५ मिळवला. देसवालशिवाय अभिजीत मलिकदेखील (७ गुण) जयपूरच्या विजयात चमकला.
सामन्याची पहिली १० मिनिटे खूपच रोमांचक होती. सामन्याच्या पहिल्याच रेडमध्ये देसवालला नितीशला बाद केले. पण तो लवकरच रिवाइव्ह झाला पण पुढच्या रेडमध्ये तो पुन्हा बाद झाला. अवघ्या पाच मिनिटांनी बंगालकडे ५-२ अशी आघाडी होती.
हाफ टाईमनंतर बंगाल सुपर टॅकल पोझिशनमध्ये होता. देसवाल याने रनिंग हँड टच केला. पुढच्या रेडमध्ये तो सुपर टॅकल झाला. बंगालचा संघ सातत्याने ऑलराउटचा प्रसंग टाळत होता. या दरम्यान फजलने त्याचे सुपर-५ पूर्ण केले. स्कोअर २४-२५ असा होता.
मात्र, जयपूरने पुढच्याच मिनिटाला बंगालला ऑलआउट करून २९-२५ अशी आघाडी घेतली. पुढच्या ४ मिनिटांत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले. देसवाल मात्र बाद झाला. दरम्यान, नितीनने सुपर-१० पूर्ण केला. यानंतर जयपूरने सलग दोन गुण घेत देसवालला रिवाइव्ह केले. आता आघाडी ४ झाली होती. अखेरच्या क्षणी जयपूरने सुपर टॅकल करत सामना जिंकला.
संबंधित बातम्या