Pro Kabaddi 2023-24 : प्रो कबड्डीमध्ये आज (३ फेब्रुवारी) यू मुंबा आणि युपी योद्धाज आमने सामने होते. या लढतीत युपी योद्धाजने यू मुंबाला ३९-२३ असे पराभूत केले. या विजयासह योद्धाने मोसमातील चौथा विजय मिळवला आहे तर मुंबाचा हा सलग तिसरा पराभव आहे.
या सामन्यात सुमितने केलेल्या अप्रतिम बचावाला गगन गौडा आणि महिपाल यांनी उत्कृष्ट आक्रमण करून साथी दिली. त्यामुळे युपी योद्धाज संघाला महत्वाच्या टप्प्यावर विजयाची नोंद करत आली.
या सामन्याच्या प्रारंभी दोन्ही संघांचे बचाव पटू उत्तम कामगिरी करत असल्याने उभय संघांचे रेडर अपयशी ठरले. अगदी यु मुंबा संघाने युपी योद्धाजचा स्टार परदीप नरवालची पकड करून पहिल्या टप्प्यात वर्चस्व मिळवले.
युपी योद्धाजने सलग गुण मिळवताना महिपाल आणि गगन गौडाच्या प्रत्येकी ४ गुणांमुळे यु मुंबावर पहिला लोन चढवून मध्यातंराला १८-११ अशी आघाडी मिळवली.
उत्तरार्धात यु मुंबा संघाने उत्कृष्ट बचाव करताना सुपर टॅकलच्या साहाय्याने कडवी झुंज दिली. आमीर मोहम्मद जाफर दानिश आणि संथ पान सेल्वम यांनी अष्टपैलू कामगिरी करताना मुंबईच्या पुनरागमनाच्या आशा कायम राखल्या.
सामना चुरशीचा होण्याची चिन्हे दिसत असताना युपी योद्धाजने स्ट्रेटेजिक टाईम आऊट नंतर पुन्हा मुसंडी मारली. सुमितने चढाईत पाचवा गुण मिळवल्यामुळे योद्धाजने यु मुंबा संघावर दुसरा लोन चढविला.
यावेळी यु मुंबाच्या हातून विजय निसटला होता. आपली पकड कायम राखताना परदीप नरवालच्या नेतृत्वाखाली युपी योद्धाजने १५ गुणांनी विजयाची पूर्तता केली आणि पराभवाची मालिका खंडित करताना प्ले ऑफ साठी आपले आव्हान कायम राखले.
यानंतर आता यूपी योद्धाचा पुढचा सामना ८ फेब्रुवारीला दिल्लीतील याच स्टेडियमवर तमिळ थलायवासशी होईल, तर यू मुंबा ४ फेब्रुवारीला बेंगळुरू बुल्सला भिडणार आहे.