प्रीती पाल हिने पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या १०० मीटर T35 प्रकारातील शर्यतीत पदक जिंकले आहे. आज शुक्रवारी (३० ऑगस्ट) भारताने जिंकलेले हे तिसरे पदक आहे. प्रीती ही ऐतिहासिक कामगिरी आहे, कारण ती पॅरालिम्पिक गेम्सच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
T35 प्रकारातील महिलांच्या १०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या प्रीती पालने १४.२१ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान पटकावले. चीनच्या धावपटूंनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. चीनच्या जिया (१३.३५ सेकंद) आणि गुओ यांनी १३.७४ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले.
प्रीती पालने यावर्षी कोबे येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकून थेट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. गतवर्षी पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रीतीला कोणतेही पदक जिंकता आले नव्हते. पण आता तिने कांस्यपदक जिंकून १४० कोटी भारतीयांना आनंद दिला आहे.
पॅरालिम्पिकमध्ये भारताने चांगली सुरुवात केली होती, परंतु पदकतालिकेत भारताचे पहिले, दुसरे आणि आता तिसरे पदक आज म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी आले. प्रितीच्या आधी अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांनी नेमबाजीत अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखरा हिने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तर दुसरीकडे मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकून अवनीसोबत पोडियम शेअर केले. आता प्रीती पालने कांस्यपदक जिंकून पदकतालिकेत भारताला फायदा करून दिला आहे. भारत आता १ सुवर्ण आणि २ कांस्यांसह पदकतालिकेत ११व्या स्थानावर आला आहे.