पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या १३ व्या दिवशी (८ ऑगस्ट) हॉकीची कांस्यपदकासाठी लढत होणार आहे. हा सामना भारत आणि स्पेन यांच्यात होणार आहे.
या सामन्यावर सर्व भारतीयांची नजर असणार आहे. कारण हॉकी टीम इंडियाची भिंत असलेल्या पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना असणार आहे. श्रीजेशने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी करत भारताला उपांत्य फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मात्र, भारत उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभूत झाला आणि आता सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी खेळत आहे.
आपल्या शेवटच्या सामन्यापूर्वी श्रीजेशने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला आणि म्हटले की, भारतासाठी खेळणे हा त्याच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. तो म्हणाला की प्रत्येक सेव्ह, डाइव्ह आणि प्रेक्षकांचा आवाज त्याच्यासोबत कायम राहील. आपल्यावर विश्वास ठेवून पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले.
पीआर श्रीजेशने लिहिले, "जेव्हा मी शेवटच्या वेळी गोल पोस्टच्या मध्ये उभा असेल, तेव्हा माझे हृदय कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून आले असेल. एका लहान मुलापासून ते भारताच्या सन्मानाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण होता.
त्याने पुढे लिहिले "आज मी भारतासाठी माझा शेवटचा सामना खेळत आहे. प्रत्येक सेव्ह, डाइव्ह आणि प्रेक्षकांचा आवाज माझ्या आत्म्यात नेहमीच गुंजत राहील. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद भारत. हा शेवट नाही, तर चांगल्या आठवणींची सुरुवात आहे."
पीआर श्रीजेशने २००४ मध्ये ज्युनियर संघासह आपला प्रवास सुरू केला आणि २००६ मध्ये तो वरिष्ठ संघात सामील झाला. ३६ वर्षीय श्रीजेश काही काळ संघात आत बाहेर होत राहिला, परंतु २०११ मध्ये त्याने गोलकीपरची जागा निश्चित केली. तेव्हापासून, श्रीजेशने ४ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे आणि २०२१ मध्ये टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.