प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या मोसमात गुजरात जायंट्स संघाने अखेर दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातने आज (१३ नोव्हेंबर) बंगाल वॉरियर्सचा ४७-२८ असा वाईटरित्या पराभव केला. गुजरात जायंट्सने सलग सात पराभवानंतर हा विजय मिळवला आहे.
या सामन्यात गुमान सिंगने शानदार खेळ करत १७ गुण मिळवले. तर बंगाल वॉरियर्सकडून कर्णधार फझल अत्राचली आणि मनिंदर सिंग वाईटरित्या फ्लॉप झाले.
गुजरात जायंट्सने दमदार सुरुवात करत पहिल्या १० मिनिटांच्या खेळात बंगालवर आघाडी घेतली. कर्णधारपद मिळाल्यानंतर गुमान सिंग या सामन्यात चमकदार कामगिरी करत होता. बंगालचा बचाव तितकासा चांगला खेळत नव्हता. नितीनने रेड टाकताना गुण मिळवले पण मनिंदर सिंगला तशी कामगिरी करता आली नाही.
गुजरात जायंट्सने बंगाल वॉरियर्सला पहिल्या हाफमध्ये दोनदा ऑल आउट केले. यामुळे त्यांची आघाडी जवळपास दुप्पट झाली. गुमान सिंगने पहिल्या हाफमध्येच सुपर-१० पूर्ण केला. गुजरातचा संघ पूर्वार्धात २४-१३ ने पुढे होता.
दुसऱ्या हाफमध्येही अशीच परिस्थिती राहिली. या सामन्यात गुजरात जायंट्स संघ अतिशय तुफानी खेळ करत होता. संघासाठी विशेष बाब म्हणजे त्यांचा बचाव चांगला खेळत होता. या कारणास्तव, दुसऱ्या हाफमध्येदेखील गुजरातने बंगाल वॉरियर्सला ऑलआउट केले आणि त्यांची आघाडी दुप्पट केली.
याआधी गुजरातने संपूर्ण स्पर्धेत केवळ दोनदाच विरोधी संघाला ऑलआऊट केले होते पण या एकाच सामन्यात त्यांनी विरोधी संघाला दोनदा ऑलआऊट केले. यावरून संघाची कामगिरी किती जबरदस्त होती याचा अंदाज येऊ शकतो.
बंगाल वॉरियर्सकडून या सामन्यात कर्णधार फजल अत्राचली अजिबात लयीत दिसत नव्हता. गुमान सिंगने त्याला अनेकवेळा बाद केले आणि शेवटी त्याला एकच गुण घेता आला. बंगाल वॉरियर्सच्या पराभवामागे मनिंदर सिंगचा फ्लॉप हेही प्रमुख कारण होते.