मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs AUS: पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या पॅट कमिन्सचा टीम इंडियाला इशारा; म्हणाला…

IND Vs AUS: पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या पॅट कमिन्सचा टीम इंडियाला इशारा; म्हणाला…

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 19, 2022 10:37 AM IST

IND Vs AUS: कमिन्सने झिम्बॉब्वे आणि न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सिरीजनंतर त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

पॅट कमिन्स
पॅट कमिन्स (फोटो - रॉयटर्स)

IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी२० वर्ल्डकप आधी प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे. आपण फिट असल्याचं आणि विरोधी संघांवर तुटून पडणार असल्याचं त्यानं म्हटलंय. कमिन्सने झिम्बॉब्वे आणि न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेतली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सिरीजनंतर त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

विश्रांतीच्या कालावधीत पॅट कमिन्सने शरीराला आराम दिला. ऑस्ट्रेलियातील घरी त्याने पत्नी, लहान मुलांसोबत वेळ घालवला. कमिन्स सध्या भारताविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेची तयारी करत आहे. यानंतर त्याचे पूर्ण लक्ष हे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपवर असणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या कमिन्सने म्हटलंय की, आता पुढच्या दौऱ्यासाठी तयार असून मला विश्वास आहे की ज्या प्रकारात खेळेन तिथे प्रभावी कामगिरी करेन. मी खेळण्यासाठी उत्सुक आहे. वर्ल्ड कपमध्ये माझा खेळ आणखी फॉर्ममध्ये असेल. आता मला फ्रेश असल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे घेतलेली विश्रांती चांगली होती."

मोहालीत मंगळवारपासून ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध संघ उतरवताना काही प्रयोग करण्याची शक्यता आहे. त्यांचे चार महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, मार्कस स्टोइनस आणि मिशेल स्टार्क यांना किरकोळ दुखापतींचा सामना करावा लागत आहे. चौघांनाही यामुळे विश्रांती देण्यात आली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग