पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उत्तर कोरियाने दमदार कामगिरी केली. उत्तर कोरियाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी १४ सदस्यीय संघ पाठवला होता. त्यांनी या खेळांमध्ये ६ पदकांची कमाई केली. उत्तर कोरियाच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये आपल्या असामान्य कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उत्तर कोरियाने ६ पदके जिंकली, यात २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पदकतालिकेत उत्तर कोरियाने ६८ वे स्थान मिळवले.
उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. पण आता त्यांचे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे खेळाडू एका वेगळ्याच अडचणीत सापडले आहेत. पदक विजेत्या खेळाडूंना त्यांच्या देशात एका विशिष्ट प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
देशासाठी रौप्य पदके जिंकलेले खेळाडू री जोंग सिक आणि किम कुम योंग यांना 'आइडियॉलॉजिकल इव्हॅल्युएशन' नामक प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे, असे टेलिग्राफने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे.
री जोंग-सिक आणि किम कुम-योंग यांनी टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते. या खेळाडूंनी त्यांच्या देशाचा नियम मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
'आइडियॉलॉजिकल इव्हॅल्युएशन' ही प्रक्रिया महिनाभर चालणार आहे. या प्रक्रियेत खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये दाखवलेल्या प्रत्येक वर्तनाचा आढावा घेतला जाईल. जर या प्रक्रियेत त्यांनी राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या शासनाच्या विरोधात वर्तन केले असेल तर त्यांना शिस्तबद्ध कारवाईला सामोरे जावे लागेल.
जर खेळाडू यात दोषी आढळले तर त्यांना कडक शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. यामध्ये शिक्षा नेमकी काय असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, पदक विजेते उत्तर कोरियाचे दोन खेळाडू शत्रू देश दक्षिण कोरिया आणि चीनच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत असल्याचे आणि हसून बोलत असल्याचे आढळून आले होते.
दक्षिण कोरियाचा पदक विजेता खेळाडू लिम जोंग-हून याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, हे फोटो व्हायरल झाले आणि यावरून उत्तर कोरियाच्या खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली. शत्रू देशांच्या लोकांसोबत संबंध ठेवणे उत्तर कोरियात गुन्हा मानला जातो.
“जर उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी इतर देशांच्या खेळाडूंशी संवाद साधला असेल तर त्यांना संभाव्य राजकीय किंवा प्रशासकीय शिक्षांपासून बचावासाठी त्यांच्या वर्तनावर कठोरपणे विचार करावा लागेल,” असे टेलिग्राफने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे.
विशेष म्हणजे, उत्तर कोरियन खेळाडूंना पॅरिसमध्ये दक्षिण कोरियन किंवा इतर परदेशी खेळाडूंशी संवाद साधू नये यासाठी 'विशेष सूचना' दिल्या होत्या आणि या आदेशाचे पालन न केल्यास परिणामाबद्दल चेतावणी देण्यात आली होती.
उत्तर कोरियाची पदके विविध स्पर्धांमध्ये आली. टेबल टेनिसमध्ये री जोंग-सिक आणि किम कुम-योंग यांनी मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. किम मी-राय आणि जो जिन-मी या डायव्हिंग जोडीने महिलांच्या १० मीटर प्लॅटफॉर्म स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. महिलांच्या ५४ किलोग्रॅम बॉक्सिंगमध्ये पँग चोल-मीने कांस्यपदक, महिलांच्या १० मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये किम मि-रायने कांस्यपदक, पुरुषांच्या ग्रीको-रोमन ६० किलो कुस्तीमध्ये चो ह्यो-ग्योंगने कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये युनायटेड स्टेट्सने सर्वाधिक एकूण १२६ पदके (४० सुवर्ण, ४४ रौप्य, ४२ कांस्य) आणि चीनने ९१ पदके (४० सुवर्ण, २७ रौप्य, २४ कांस्य) जिंकली.