भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आज (८ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरणार आहे. भालाफेकपटू नीरज १४० कोटी भारतीयांची सर्वात मोठी आशा आहे. नीरजचा इव्हेंट आज रात्री ११:५५ वाजता सुरू रंगणार आहे. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
दरम्यान, नीरज चोप्राचा सुवर्णपदकाचा सामना कठीण असणार आहे. कारण अंतिम फेरीतील काही खेळाडू नीरजला कडवी टक्कर देऊ शकतात.
दरम्यान, नीरजने ८९.३४ मीटरच्या शानदार थ्रोसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच तो सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, आपण येथे अशा ५ दिग्गज भालाफेकपटूंबद्दल जाणून घेणार आहोत जे भारताचे आणि नीरजचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतात.
ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हादेखील अंतिम फेरीत चमत्कार घडवू शकतो. पात्रता फेरीत त्याने ८८.६३ मीटर भाला फेकला होता, ज्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पीटर्सचा हा हंगामातील सर्वोत्तम थ्रो आहे. जागतिक क्रमवारीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. अँडरसन पीटर्सने पात्रता फेरीत नीरज चोप्राच्या एका स्थानाने मागे राहून दुसरे स्थान पटकावले.
झेक प्रजासत्ताकचा स्टार भालाफेकपटू जेकब वडलेज पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत नीरच चोप्रासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. तो सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने पात्रता फेरीत ८५.६३ मीटर फेक करून सातवे स्थान पटकावले. त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ८८.६५ मीटर आहे. वडलेजचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो ९०.८८ मीटर होता.
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यानेही अलीकडच्या काळात या खेळात आपला ठसा उमटवला आहे. अर्शदने ८६.५९ मीटर भालाफेक करून ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या मोसमात हा त्याचा सर्वोत्तम थ्रो आहे. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो ९०.१८ मीटर आहे. अर्शद पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिला.
जर्मनीचा स्टार भालाफेकपटू ज्युलियन वेबर अंतिम फेरीत नीरज चोप्राला कडवी टक्कर देऊ शकतो. सध्या तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो ८८.३७ मीटर आहे तर पात्रतेमध्ये त्याने ८७.७६ मीटर भाला फेकला होता.
केनियाचा भालाफेकपटू ज्युलियन येगो पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत ८५.९७ मीटर भालाफेक करून फायनलसाठी पात्र ठरला. तो पाचव्या क्रमांकावर राहिला. हा त्याचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो देखील आहे. एवढेच नाही तर ज्युलियसचा हा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोही होता. जागतिक क्रमवारीत तो १५व्या स्थानावर आहे.