Paris Olympics 2024 : दूध विक्रेत्याच्या मुलीनं पदकाच्या आशा उंचावल्या, कोण आहे तिरंदाज अंकिता भकत? वाचा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics 2024 : दूध विक्रेत्याच्या मुलीनं पदकाच्या आशा उंचावल्या, कोण आहे तिरंदाज अंकिता भकत? वाचा

Paris Olympics 2024 : दूध विक्रेत्याच्या मुलीनं पदकाच्या आशा उंचावल्या, कोण आहे तिरंदाज अंकिता भकत? वाचा

Jul 25, 2024 10:14 PM IST

Who Is Ankita Bhakat: पॅरिस ऑलिम्पिक उद्यापासून सुरू होत आहे. या स्पर्धेत २०६ देशांतील १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारी अंकिता भकत आहे तरी कोण?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारी अंकिता भकत आहे तरी कोण?

Ankita Bhakat Success Story: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी तिरंदाजी संघाने आनंदाजी बातमी दिली. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या अंकिता भकतने चमकदार कामगिरी केली. अंकिताने ६६६ गुणांसह मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या केली. ती अकराव्या क्रमांकावर राहिली. अंकिताने वैयक्तिक रिकर्व्ह पात्रता स्पर्धेत भारतीय संघात सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, अंकिता भकत कोण आहे? हे जाणून घेऊयात.

अंकिता भकत पश्चिम बंगालतील कोलकाता येथील चिडिया मोडमध्ये वास्तव्यास आहे. अंकिताची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, ती धारीवर धनुष्यबाण घेऊन सराव करायची. कारण, नवीन धनुष्यबाण खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये लागतात. २६ वर्षीय अंकिता लहानपणापासूनच तिरंदाजीच्या प्रेमात पडली. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने कोलकाता तिरंदाजी क्लबमध्ये प्रशिक्षण सुरू केले. यानंतर ती जमशेदपूरच्या तिरंदाजी अकादमीत गेली. सुमारे १० वर्षांपूर्वी तिची टाटा आर्चरी अकादमीमध्ये निवड झाली, यानंतर तिचे आयुष्य बदलले.

सोल इंटरनॅशनल युथ आर्चरी फेस्टमध्ये तिला पहिले यश

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अंकिताने जागतिक तिरंदाजी युवा चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी प्रथमच भाग घेऊन तिच्या स्वप्नांना पंख देण्यास सुरुवात केली. सोल इंटरनॅशनल युथ आर्चरी फेस्टमध्ये तिला पहिले यश मिळाले, जिथे तिने रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. यानंतर २०१७ मध्ये तिने अर्जेंटिना येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपदाच्या मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

खेळो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

अंकिताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी आशियाई खेळ २०२३ मध्ये महिलांच्या सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपली प्रतिभा दाखवली. सिमरनजीत कौर आणि भजन कौर यांच्या टीममध्ये तिचा समावेश होता. या विजयानंतर अंकिताने तुर्कीतील अंतल्या येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी ऑलिम्पिक क्वालिफायर २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. अंकिताने २०२२ मध्ये खेळो इंडिया महिला राष्ट्रीय रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक जिंकले.

धनुर्विद्या हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये लक्ष, संयम आणि एकाग्रतेला खूप महत्त्व दिले जाते. अवघ्या काही वेळातच या खेळाने संपूर्ण जगात स्वतःचे स्थान निर्माण केले. तिरंदाजीच्या खेळात 'धनुष्य आणि बाण' वापरले जातात आणि या खेळाचे नाव लॅटिन शब्द 'आर्क्स' वरून आले आहे ज्याचा अर्थ 'धनुष्य' आहे.

Whats_app_banner
विभाग