पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप झाला आहे. या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने सर्वाधिक पदके जिंकली. १०० हून अधिक पदके जिंकणारा यूएसए हा एकमेव देश आहे. तर भारताला केवळ ६ पदकं जिंकता आली.
दरम्यान, या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एक देश असाही होता ज्याची लोकसंख्या २ लाखांपेक्षा कमी आहे, परंतु या देशाने १ सुवर्ण पदक आणि १ रौप्य पदक जिंकले. आश्चर्याची बाब म्हणजे या देशाने केवळ ४ खेळाडू पॅरिसला पाठवले होते.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एकूण ८४ देश असे आहेत, ज्यांच्या किमान एका खेळाडूने एक पदक जिंकले आहे.
याशिवाय पदकतालिकेत चीन दुसऱ्या, जपान तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, फ्रान्स पाचव्या आणि भारत ७१व्या स्थानावर आहे. यावेळी असे अनेक देश होते ज्यांच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने जगाला चकित केले.
केवळ १.८ लाख लोकसंख्या असलेल्या सेंट लुसियाने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फक्त ४ खेळाडू पाठवले होते आणि २ पदके जिंकली. यामध्येही एक सुवर्णपदक आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे. हा देश पदकतालिकेतही भारतापेक्षा खूप वर आहे. सेंट लुसियासाठी दोन्ही पदके महिला स्प्रिंट धावपटू ज्युलियन अल्फ्रेडने जिंकली, ज्युलियनने महिलांच्या १०० मीटर शर्यतीत सुवर्ण आणि २०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले.
केवळ सेंट लुसियाच नाही तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असे अनेक देश होते, ज्यांची लोकसंख्या खूपच कमी होती, परंतु त्यांच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि पदके जिंकली.
यामध्ये नॉर्वे आणि स्लोव्हेनियासारख्या देशांचा समावेश आहे. ५६ लाख लोकसंख्या असूनही नॉर्वेने ४ सुवर्णांसह एकूण ८ पदके जिंकली आहेत. स्लोव्हेनियाची लोकसंख्या २२ लाखही नाही, तरीही २ सुवर्ण पदकांसह ३ पदके जिंकली. तर १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला केवळ ६ पदके जिंकता आली. पण यात एकही सुवर्णपदक नाही.
१) यूएसए - १२६ पदके
२) चीन - ९१ पदके
३) जपान - ४५ पदके
४) ऑस्ट्रेलिया - ५३ पदके
५) फ्रान्स - ६४ पदके
७१) भारत - ६ पदके