भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार हा अनुभवी नेमबाज; पीव्ही सिंधू ध्वजवाहक!
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार हा अनुभवी नेमबाज; पीव्ही सिंधू ध्वजवाहक!

भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार हा अनुभवी नेमबाज; पीव्ही सिंधू ध्वजवाहक!

Jul 08, 2024 09:53 PM IST

ऑलिम्पिक खेळ सुरू होण्यापूर्वी गगन नारंग याने मेरी कोमची जागा घेतली आहे. तर पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांना ध्वजवाहक बनवण्यात आले आहे.s

 Paris Olympics 2024 भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार हा अनुभवी नेमबाज; पीव्ही सिंधू ध्वजवाहक!
Paris Olympics 2024 भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार हा अनुभवी नेमबाज; पीव्ही सिंधू ध्वजवाहक! (Getty Images)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) सोमवारी (८ जुलै) गगन नारंग याची भारतीय दलाचे शेफ-डी-मिशन म्हणून नियुक्ती केली. लंडन ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत गगन नारंग कांस्यपदक विजेता होता आणि त्याने मेरी कोमची जागा शेफ-डी-मिशन म्हणून घेतली आहे.

शेफ-डी-मिशन म्हणजे गगन नारंग आता भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय ध्वजधारकांचीही घोषणा करण्यात आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू महिला ध्वजवाहक असेल, तर दुसरीकडे पुरुषांमध्ये ही जबाबदारी टेबल टेनिसचा दिग्गज ए शरथ कमल याेच्याकडे सोपवण्यात आली आहे.

वास्तविक, मेरी कोम हिची सुरुवातीला शेफ-डी-मिशन या पदासाठी निवड झाली होती, परंतु यावर्षी एप्रिलमध्ये मेरी कोमने काही कारणांमुळे ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.

यावर IOA अध्यक्ष पीटी उषा यांनी एक निवेदन जारी केले की, मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूच्या शोधात होते. माझ्या मते गगन नारंग हा मेरी कोमची जागा घेण्यास सर्वोत्तम खेळाडू आहे. तर पीव्ही सिंधू आणि ए शरथ कमल हे उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे ध्वजवाहक असतील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.

पॅरिस ऑलिम्पिक गेम्स २०२४ कधी सुरू होतील?

पॅरिस ऑलिम्पिक खेळ २६ जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या खेळांमध्ये १९६ देशांतील १० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ऑलिम्पिकमधील २८ खेळ तेच असतील ज्यांचा २०१६ आणि २०२० च्या खेळांमध्ये समावेश करण्यात आला होता. पण स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग यासारखे काही नवीन खेळ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत.

आतापर्यंत १२५ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

आत्तापर्यंत भारतातील एकूण १२५ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात मोठा संघ असेल. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा समावेश आहे, ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

आतापर्यंत, नेमबाजी, ऍथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, तिरंदाजी, नौकानयन, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन यासह १६ खेळांमधील भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग