भारतीय कुस्तीपटू निशा दहिया हिला महिलांच्या ६८ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तिला उत्तर कोरियाच्या सोल गमने १०-८ अशा फरकाने पराभूत केले. दुसऱ्या हाफला सुरुवात होण्यापूर्वी निशा ४-० अशी आघाडीवर होती, पण दुसऱ्या हाफमध्ये तिच्या खांद्याला दुखापत झाली.
बरं, निशाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आशा अजून संपलेल्या नाहीत. तिला पराभूत करणारी उत्तर कोरियाची कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला 'रिपेचेज'द्वारे कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळेल.
दरम्यान, निशाच्या दुखापती आणि सामना संपल्यानंतर भारतीय प्रशिक्षकाने मोठे आरोप केले आहेत. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक वीरेंद्र दहिया यांनी पीटीआयला सांगितले की, “हे १०० टक्के जाणूनबुजून होते, तिने निशाला जाणीवपूर्वक वेदना दिल्या. आम्ही पाहिले की कोरियन कोपऱ्यातून एक सूचना आली ज्यानंतर तिने मनगटाच्या सांध्याजवळ हल्ला केला. तिने निशाकडून पदक हिसकावून घेतले.
प्रशिक्षक पुढे म्हणाले, “निशाने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, तिच्या गळ्यात पदक पक्के होते, पण आता ते हिसकावले गेले आहे. निशा बचाव आणि प्रतिआक्रमण दोन्हीमध्ये उत्कृष्ट होती, तिने आशियाई पात्रता स्पर्धेत याच कुस्तीपटूचा पराभव केला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सोल गमने दुसऱ्या हाफची आक्रमक सुरुवात केली आणि १ गुण मिळवला, परंतु निशाने तिला रिंगमधून बाहेर काढले आणि तिची आघाडी ६-१ अशी वाढवली. तिने आणखी दोन गुणांसह आपली आघाडी मजबूत केली, परंतु यादरम्यान तिच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
सामन्याला अजून एक मिनिट बाकी होता आणि निशा वेदनेने ओरडू लागली. उपचारानंतर तिने खेळ पुन्हा सुरू केला पण उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूला रोखण्यात तिला यश आले नाही. निशा ओल्या डोळ्यांनी ती मॅटवरून खाली उतरली.
एकावेळी निशा ८-१ ने आघाडीवर होती, परंतु उत्तरार्धात ती वेदनांनी कमालीची त्रस्त दिसली, ज्यामुळे डॉक्टरांनी तपासणीसाठी सामन्यात एकदा, दोनदा नाही तर तीनदा मॅटवर यावे लागले. खांदा निसटला असूनही निशा हार मानायला तयार नव्हती आणि वेदना होत असतानाही कुस्ती सुरूच ठेवली. पण अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचा कुस्तीपटू सोल गमसाठी विजय सोपा झाला.
निशाने उत्तर कोरियाच्या कुस्तीपटूविरुद्ध दमदार सुरुवात केली होती आणि सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती, पण दुखापतीमुळे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील चौथे पदक हिरावले आहे.
पराभवानंतर निशा दहियाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. दरम्यान, तिची प्रतिस्पर्धी पैलवान सोल गम ही आली आणि निशाला खिलाडूवृत्तीचे उदाहरण देत उठण्यास मदत केली. भारतीय कुस्तीपटूने याआधी पहिल्या फेरीत युक्रेनच्या टेटियाना सोव्हाचा ६-४ अशा फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.