पॅरिस ऑलिम्पिक २०२४ आता शेवटच्या टप्प्यात आहे. सर्व देशांतील खेळाडू एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पदकतालिकेतही सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मात्र, आता फार कमी इव्हेंट शिल्लक आहेत. त्यामुळे यापुढे पदकतालिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
दरम्यान, गुरुवारी (८ ऑगस्ट) भारताने दोन पदके जिंकली. यात एक कांस्य आणि एक रौप्य पदक आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश मिळविले आहे. सध्या पदकतालिकेत कोणता संघ पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारतासह पाकिस्तानची स्थिती काय आहे ते पाहूया.
अमेरिका अव्वल स्थानावर कायम आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने आतापर्यंत १०३ पदके जिंकली आहेत. यूएसए हा एकमेव देश आहे ज्याने १०० हून अधिक पदके जिंकली आहेत. यूएसएकडे ३० सुवर्ण, ३८ रौप्य आणि ३५ कांस्य पदके आहेत.
यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ७३ पदके जिंकली आहेत. चीनने आतापर्यंत २९ सुवर्ण, २५ रौप्य आणि १९ कांस्यपदके जिंकली आहेत.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५ पदके जिंकली आहेत. सुरुवातीलाच नेमबाजीत ३ पदके आली होती. यानंतर यावेळी पदकांची संख्या चांगली असेल, असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही. ८ ऑगस्टला भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. यानंतर रात्री उशिरा नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले.
म्हणजे एकाच दिवशी दोन पदके आली आहेत. यासह पदकांची संख्या ५ झाली आहे. भारत आता ५ पदकांसह पदकतालिकेत ६४ व्या क्रमांकावर आहे.
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला अखेर पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. भालाफेकमध्ये नीरजने रौप्यपदक जिंकले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले.
पाकिस्तानच्या नावावर एकच पदक आहे. या एका पदकासह पाकिस्तान सध्या पदकतालिकेत ५३ व्या स्थानावर पोहोचला आहे. पदकतालिकेत पाकिस्तान पुढे आहे कारण त्यांच्याकडे सुवर्ण आहे, तर भारताकडे ५ पदके आहेत, परंतु एकही सुवर्ण नाही.