पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा ११ वा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खास होता. भालाफेकीत नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर विनेश फोगट हिने पहिल्यांदाच ५० किलो वजनी गटातून फायनलमध्ये एन्ट्री केली. अशाप्रकारे पहिल्यांदाच भारतीय महिला पैलवान ऑलिम्पिकची कुस्ती फायनल खेळणार आहे.
भारतीय खेळाडूंच्या या ऐतिहासिक यानंतर दिग्गज कुस्तीपटू आणि देशवासीयांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.
विनेश फोगटला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खूपच कठीण जाणार असे बोलले जात होते. कारण हा सामना टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील सुवर्णपदक विजेत्या युई सुसाकी हिच्याशी होता. पण विनेश फोगटने शेवटच्या क्षणांमध्ये तिचा ३-२ असा पराभव करत सामना जिंकण्यात यश मिळवले.
यानंतर विनेश फोगटने राउंड ४ मध्ये ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना युस्नेलिस गुझमनशी झाला. या सामन्यात विनेश फोगटने तिला ५-० ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अशा प्रकारे विनेशने अवघ्या २४ तासात जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या तीन कुस्तीपटूंना धुळ चारली.
तसेच, विनेश फोगटने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. विनेश फोगट ही कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.
विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे.
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने सामन्यानंतर ईएसपीएनशी बोलताना सांगितले, “ही विनेशची नेहमीची शैली नाही. ती सहसा आक्रमण करणारी असते. पण सुसाकी खूप हुशार आणि अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे विनेशने आज तिची रणनीती बदलली. तिने अतिशय हुशारीने लढा दिला. , कारण एका चुकीमुळे सुसाकीला संधी मिळू शकली असती”.
यानंतर साक्षी मलिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक भावनिक पोस्ट शेअर केली. याशिवाय बजरंग पुनियालाही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने ते X वर शेअर केले.
विनेश फोगटचे काका महावीर फोगट म्हणाले, "ती सुवर्णपदक जिंकेल. माझा तिच्यावर आणि तिच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. हा विजय तिच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांच्या तोंडावर चपराक आहे."