भालाफेकपटू अर्शद नदीम पाकिस्तानचा नवा सुपरस्टार बनला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान त्याचे कौतुक करत आहे. नदीमने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ९२.९७ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक विक्रमही मोडला.
या ऐतिहासिक विजयासाठी त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. चहूबाजूंनी पैशांचा वर्षाव होत असताना सासरच्या मंडळींकडून अर्शद नदीम याला एक म्हैस भेट म्हणून मिळाली आहे.
अर्शद नदीम पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्याचे सासरे मोहम्मद नवाज यांनी त्याला एक म्हैस भेट दिली. अशी भेट देताना नवाज म्हणाले की, पाकिस्तानच्या ग्रामीण भागात म्हशीला खूप मौल्यवान मानले जाते आणि खेडेगावात हा आदर दाखवण्याचा एक मार्ग आहे.
नदीमच्या पत्नीचे नाव आयेशा असून त्यांचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नदीम-आयशा यांना २ मुले आणि १ मुलगी आहे.
पाकिस्तानच्या या भालाफेक स्टारवर सध्या सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडत आहे. त्याला पहिले पारितोषिक जागतिक ॲथलेटिक्सकडून मिळणार आहे, ज्यात अर्शद नदीमला बक्षीस रक्कम म्हणून ५० हजार डॉलर्स दिले जातील. भारतीय चलनात ५० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ४२ लाख रुपये होतात.
सोबतच अर्शदला पाकिस्तान सरकारकडूनही भरपूर पैसे मिळणार आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने नदीमला १० कोटी पाकिस्तानी रुपये देण्याचे आधीच आश्वासन दिले आहे.
याशिवाय पंजाबचे राज्यपाल सरदार सलीम हैदर खान हे अर्शदला २० लाख पाकिस्तानी रुपये देणार आहेत.
यानंतर सिंध प्रांताचे मुख्यमंत्री आणि कराचीचे महापौर मिळून अर्शदला ५ कोटी पाकिस्तानी रुपये आणि सिंधचे राज्यपाल कामरान टेसोरी स्वतंत्रपणे १० लाख रुपये देणार आहेत.
प्रसिद्ध पाकिस्तानी संगीतकार अली जफर देखील नदीमला १० लाख रुपये भेट देणार आहे. ही रक्कम एकत्रितपणे पाकिस्तानी चलनात अंदाजे १५.४ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ४.५ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे.