पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करून पदके जिंकली. याच नेमबाजांमध्ये मराठमोळा स्वप्नील कुसळे हा देखील होता. स्वप्नीलने ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
पण आता स्वप्नीलच्या वडिलांनी महाराष्ट्र सरकारसमोर एक मागणी ठेवली आहे. त्यांनी आपल्या मुलासाठी ५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आणि एका फ्लॅटची मागणी केली आहे.
स्वप्नीलने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात पदक जिंकण्यात यश मिळवले. महाराष्ट्र सरकारने त्याला २ कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते, पण आता त्याचे वडिल सुरेश कुसळे यांनी आणखी बक्षीस रकमेची मागणी केली आहे. या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण सहा पदके जिंकली होती, त्यापैकी तीन नेमबाजीत आले.
हरियाणा सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांना ५ कोटी रुपये दिले आणि त्या तुलनेत त्यांच्या मुलाला कमी पैसे मिळाल्याचे स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे यांनी सांगितले.
कोल्हापूरचे रहिवासी असलेले स्वप्नीलचे वडील इथेच थांबले नाहीत. आपल्या मुलाला फ्लॅट देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. आपल्या मुलाला सरकारने पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात फ्लॅट द्यावा, असे सुरेश कुसळे म्हणाले.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की "हरयाणा सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांना ५ कोटी रुपये (हरियाणा सरकारच्या धोरणानुसार, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला ६ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ४ कोटी रुपये) आणि कांस्यपदक विजेत्याला अडीच कोटी रुपये) दिले.
महाराष्ट्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ऑलिम्पिक पदक विजेत्याला २ कोटी रुपये मिळतात.
ते पुढे म्हणाले, "आपल्या सरकारने सुवर्णपदक विजेत्याला ५ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ३ कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. पण जेव्हा वैयक्तिक स्पर्धेत केवळ दोनच खेळाडू जिंकले तेव्हा हे प्रमाण कशासाठी? स्वप्नील ऑलिम्पिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा केवळ दुसरा खेळाडू आहे. अशा स्थितीत त्याला ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात यावे, अशी मागणी सुरेश कुसळे यांनी केली.
स्वप्नीलच्या वडिलांनी सांगितले की, जर त्यांना हे माहित असते तर त्यांनी आपल्या मुलाला इतर कोणत्या तरी खेळात पाठवले असते. ते म्हणाले, "हे घडणार आहे हे मला माहीत असते तर मी त्याला दुसऱ्या खेळात करिअर करण्यास सांगितले असते. स्वप्नील हा गरीब घरचा आहे, त्यामुळे बक्षिसाची रक्कम कमी केली का? तसेच, जर तो आमदार किंवा मंत्र्याचा मुलगा असता तर बक्षिसाची रक्कम कमी दिली असती का? असाही सवाल कुसळे यांनी केला.
सुरेश कुसळे यांची मागणी इथेच थांबली नाही. पुण्यातील ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंग मैदानाला आपल्या मुलाचे नाव द्यावे, असे ते म्हणाले.
“स्वप्नीलला ५ कोटी रुपये मिळायला हवेत. बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ फ्लॅट मिळावा जेणेकरून त्याला सहज सराव करता येईल. तसेच, त्या क्रीडा संकुलाला स्वप्नील याचे नाव द्यावे, असेही सुरेश कुसळे म्हणाले."
संबंधित बातम्या