ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना पदक प्रदान करण्यात येते. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्येही ही परंपरा कायम आहे. भारताच्या मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यानंतर ती चर्चेत आली.
तसेच, मनू भाकरने पदक जिंकल्यानंतर या ऑलिम्पिकमधील खास पद्धतीने बनवण्यात आलेल्या पदकांची चर्चा सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या प्रत्येक पदकावर आयफेल टॉवरच्या लोखंडाचा तुकडा लावण्यात आला आहे.
आयफेल टॉवर १८८७ ते १८८९ दरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये बांधण्यात आला होता. गेल्या शतकात, आयफेल टॉवरची प्रतिष्ठा राखण्यासाठी वेळोवेळी नूतनीकरण केले गेले. आयफेल टॉवरचे सौंदर्य टिकवण्यासाठी त्यातून काही लोखंड काढण्यातही आले. ऑलिम्पिक २०२४ आणि पॅरालिम्पिकच्या पदकांमध्ये याच लोहाचा वापर करण्यात आला आहे.
पॅरिस आणि फ्रेंच वारशाचे प्रतीक म्हणून आयफेल टॉवरमधील लोखंडाचा तुकडा जगातील सर्वोत्तम खेळाडूंना दिला जात आहे.
आयफेल टॉवर चालवणाऱ्या कंपनीने या ऐतिहासिक वास्तूला नवी ओळख देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूने फ्रान्सच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक भाग आपल्यासोबत घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती.
प्रत्येक पदक हे केवळ ऑलिम्पिक खेळांचे प्रतीक नसून एक ऐतिहासिक वास्तूही असेल. पॅरिस ऑलिम्पिकच्या आयोजकांनी चॉमेट नावाच्या जगप्रसिद्ध ज्वेलरी कंपनीच्या सहकार्याने ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदकांची रचना तयार केली होती.
आयफेल टॉवरचे लोखंड या पदकाच्या मध्यभागी ठेवण्यात आले असून त्याला षटकोनीचा आकार देण्यात आला आहे.
या षटकोनीला गडद राखाडी रंग देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आयफेल टॉवरचे लोखंड बसवण्यात आले आहे, तेथे इंग्रजीत 'पॅरिस २०२४' असे शब्द छापण्यात आले आहेत. षटकोनीच्या सहाही कोपऱ्यांवर सोनेरी रंगाची रत्ने बसवण्यात आली असून, ते पदकाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.