Paris Olympics: भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये; पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनला ४-२ नं केलं पराभूत!-paris 2024 olympics hockey india beat great britain 4 2 in shootout ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Paris Olympics: भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये; पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनला ४-२ नं केलं पराभूत!

Paris Olympics: भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये; पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनला ४-२ नं केलं पराभूत!

Aug 04, 2024 04:52 PM IST

Indian Hockey Team: पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये रविवारी खेळण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटेनचा पराभव केला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनलमध्ये भारताने ग्रेट ब्रिटेनला हरवलं
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनलमध्ये भारताने ग्रेट ब्रिटेनला हरवलं (PTI)

Indian Hockey Team Beat Great Britain: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रविवारी भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळाला. पुरुष हॉकीच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारत आणि ब्रिटेन यांच्यातील सामना १-१ ने बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. भारताने शूटआऊटमध्ये ब्रिटेनला ४-२ ने पराभूत केले. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शूटआऊटमध्ये त्याने इंग्लंडचे दोन गोल वाचवले. कर्णधार हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय आणि राजकुमार पाल यांनी गोल केले. तर, ब्रिटनकडून जेम्स अल्बेरी आणि जॅक वॉलेस यांनी गोल केले.

भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. त्यानंतर १७ व्या मिनिटाला अमित रोहितदासला रेड कार्ड मिळाल्याने भारताला मोठा धक्का बसला. त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि उर्वरित सामना भारताला १० खेळाडूंसह खेळावा लागला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने भारताचे खाते उघडले. भारताला २२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचे हरमनप्रीतने सोने केले. मात्र, ब्रिजेटने थोड्याच वेळात बरोबरी साधली. २७ व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल केला.

३६ वर्षीय श्रीजेशच्या नेतृत्वात ब्रिटनच्या प्रत्येक आक्रमणाचा बचाव करून त्यांना आघाडी घेऊ दिली नाही. याबद्दल भारतीय बचावफळीचे कौतुक करावे लागेल. ब्रिटनने २८ वेळा भारतीय गोलवर आक्रमण केले आणि त्याला एकच यश मिळाले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला पुन्हा चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ब्रिटनने पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ दाखवला आणि ३६व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर फुरलोंगचा शॉट श्रीजेशने वाचवला. ग्रेट ब्रिटनने चौथ्या क्वार्टरमध्ये ही आक्रमक मालिका कायम ठेवली. पण दहा खेळाडू असूनही भारताने एकही गोल गमावला नाही. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही.

भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी

पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. २०२१ मध्ये टोकियो येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनला पराभूत करून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारताने ग्रेट ब्रिटनला ३-१ असे पराभूत केले होते. पण उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र. भारतीय संघाने कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला पराभूत करून ४१ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. भारतीय हॉकी संघ आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्या पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करेल.

विभाग