पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या सचिन खिल्लारे याने इतिहास रचला आहे. सचिनने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. हे आजचे (४ सप्टेंबर) पहिले पदक आहे.
या रौप्य पदकासह सचिन खिल्लारे हा ४० वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.
सचिन सर्जेराव खिलारी हा सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा आहे. तो ९ वर्षांचा असताना सायकवरून पडला, यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. यानंतर गँगरीनमुळे त्याच्या डाव्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आली.
दरम्यान, सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले.
सचिन सर्जेराव खिलारी यान १६.३२ मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. सचिनने दुसऱ्या प्रयत्नातच १६.३२ मीटर गोळा फेकला होता. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्ट याने १६.३८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या तर रोहित कुमार नवव्या स्थानी राहिला.
पहिला प्रयत्न १४.७२ मीटर
दुसरा प्रयत्न १६.३२ मीटर
तिसरा प्रयत्न १६.१५ मीटर
चौथा प्रयत्न १६.३१ मीटर
पाचवा प्रयत्न १६.०३ मीटर
आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न १५.९५ मीटर होता.
३४ वर्षीय सचिनने १६.३२ मीटर गोळा फेकून क्षेत्रविक्रमही केला. दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला होता. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील भारताचे हे २१ वे पदक आहे.
सचिनने २०२३ वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने २०२४ च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देखील भाग घेतला, जिथे त्याने त्याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
पॅरालिम्पिकच्या इतिहासात गोळाफेकीत पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि दीपा मलिकने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक ८ वर्षांनंतर आले आहे.