पंढरपूरच्या १६ वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं! इंग्लिश खाडी दोनदा पोहून पार करत रचला इतिहास
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  पंढरपूरच्या १६ वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं! इंग्लिश खाडी दोनदा पोहून पार करत रचला इतिहास

पंढरपूरच्या १६ वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं! इंग्लिश खाडी दोनदा पोहून पार करत रचला इतिहास

Published Jul 31, 2024 07:00 PM IST

Sport News : सहिष्णू जाधव या १६ वर्षीय मुलाने इंग्लिश खाडी दुसऱ्यांदा पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो.

पंढरपूरच्या १६ वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं!
पंढरपूरच्या १६ वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं!

English bay : पंढरपूरमध्ये राहणाऱ्या सहिष्णू जाधव या १६ वर्षीय मुलाने इंग्लिश खाडी दुसऱ्यांदा पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो,  पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून पार करत सहिष्णू याला अपवाद ठरला आहे. हा धाडसी जलतरणपटू २९ जुलै २०२४ रोजी दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून गेला. सहिष्णू हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या गावाचा तरुण आहे.सध्या तो लंडन मध्ये आई वडिलां सोबत रहातो.

आजपर्यंत केवळ ६५ भारतीयांनी पार केलीय इंग्लिश खाडी -

गेल्या वर्षी, सहिष्णूने सहा व्यक्तींच्या टीमसोबत १६ तासांच्या संघर्षानंतर इंग्रजी खाडी पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या टीमसोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे १५ तास ८ मिनिटांत हे अंतर पार  केले. सहिष्णू हा दोन वेळा इंग्रजी खाडी पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ ६५ भारतीयांनी इंग्लिश खाडी पोहली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे आणि त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे.

यावेळी बोलताना सहिष्णू म्हणाला, खाडी पोहून पार करणे हे क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यापेक्षा मला चांगले वाटले. पण अधिक महत्त्वाचे म्हणजे, याने मला शिकवले की आपल्या मर्यादा अनेकदा केवळ भ्रम असतात आणि चिकाटीने आपण आपल्या विचारांपेक्षा पुढे जाऊ शकतो.

ओपन वॉटर स्विमिंग हा मुळातच अवघड क्रीडा प्रकार असून त्यात इंग्लिश खाडी ही तर अत्यंत खडतर अशा परीक्षेला सामोरे जायला लावणारी आहे. या पूर्ण प्रवासात मला माझ्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही मर्यादा वाढवाव्या लागल्या. ज्या क्षणी मी त्या थंड चॅनलच्या पाण्यात उडी घेतली, तेव्हा ते एप्रिलमधील अचानक आलेल्या पावसासारखे वाटले. प्रत्येक स्ट्रोक हा एक लढा होता. काही क्षण असे आले जेव्हा मला आपण समुद्राशी कबड्डीचा न संपणारा खेळ खेळत असल्यासारखे वाटले. समुद्र मला मागे खेचत होता. तर मी स्वतःला पुढे ढकलत होतो.

सहिष्णूचा जलतरणातील प्रवास मागील वर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या १५ व्या वर्षी सुरु झाला. टीमचे जलतरण २९ जुलै रोजी पहाटे सुरु झाले, आणि प्रवाह, तापमान बदल, आणि थकव्याच्या अडचणींना तोंड देत त्यांनी हा प्रवास संध्याकाळी पूर्ण केला. २९ जुलैच्या जलतरणात खूप आव्हाने होती. शेवटच्या दोन तासांत सात फुटांच्या मोठ्या लाटा आणि प्रवाह होते ज्यामुळे पायलटला जलतरण रद्द करावे  लागेल अशी परिस्थिती शेवटच्या काही तासांमधे निर्माण झाली होती.   प्रवाह, वारे, आणि मोठ्या लाटांमुळे - मार्ग साधारणपणे इंग्रजी एस (S) आकाराचा असतो. हा प्रवास २१ मैलांचा होता, पण प्रवाह आणि उच्च लाटांमुळे  २९.८ मैल (४८ किमी) झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या