Asia Cup 2023 : आशिया कप पाकिस्तानातच होणार, टीम इंडिया कुठे खेळणार सामने? ठिकाण जाणून घ्या
India Vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ साठी मधला मार्ग शोधण्यात आला आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. मात्र भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर जावे लागणार नाही. या स्पर्धेअंतर्गत टीम इंडिया आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे.
आशिया चषक २०२३ च्या (Asia Cup 2023) यजमानपदावरून गेल्या ५ महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता जवळपास मिटण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेत भारतीय संघाला सहभागी करून घेण्यासाठी नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार भारतीय संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही.
ट्रेंडिंग न्यूज
वास्तविक, आशिया कप २०२३ चा पाकिस्तानमध्येच होऊ शकतो. तर भारतीय संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. आशिया कप आयोजित करण्यासाठी पीसीबीने हा उपाय शोधला आहे. भारतीय संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकेल.
आशिया चषकासंदर्भात टीम इंडियाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ESPNcricinfo ने आपल्या रिपोर्टमध्ये या संपूर्ण योजनेची माहिती दिली आहे. भारतीय संघाच्या सामन्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाईल.
दरम्यान, आशिया कप (Asia Cup 2023) यावर्षी सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत, यूएईमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला तापमान साधारणपणे ४० अंशाच्या आसपास राहते. मात्र, अशा स्थितीतही तिथे क्रिकेट खेळले जाते. आयपीएल २०२१ चा हंगामही सप्टेंबरच्या अखेरीस येथे खेळला गेला होता. तर २०२१ T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचे काही सामने ओमानची राजधानी मस्कत येथे झाले होते. तसेच, इंग्लंड देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
आशिया चषकात १३ सामने होणार
यावेळीदेखील आशिया चषक स्पर्धेत केवळ ६ संघ सहभागी होणार आहेत. हे संघ भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान गतविजेता श्रीलंका, बांगलादेश आणि एक पात्रता संघ असेल. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.
यानंतर दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत ४ संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशा प्रकारे आशिया कप २०२३ मध्ये अंतिम सामन्यासह एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.
भारत-पाकिस्तान तीन सामने रंगण्याची शक्यता
यावेळी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटातील तिसरा संघ पात्रता फेरीतून ठरेल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात राहतील. यावेळीही स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान तीन सामने होण्याची शक्यता आहे.