मराठी बातम्या  /  क्रीडा  /  दादानं शर्ट काढला सर्वांनी बघितलं, पण कैफ-युवीचा ‘हा’ किस्सा कोणालाच माहीत नाही

दादानं शर्ट काढला सर्वांनी बघितलं, पण कैफ-युवीचा ‘हा’ किस्सा कोणालाच माहीत नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 14, 2022 10:55 AM IST

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २० वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर या दिवशी नॅटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला होता. या अंतिम सामन्यात भारताने ३२६ धावांचे लक्ष्य गाठले होते.

SACHIN TENDULKAR
SACHIN TENDULKAR

भारतीय क्रिकेट इतिहासातील १३ जूलैचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. १३ जुलै २००२ रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने लॉर्ड्सवर इतिहास रचला होता.  या अंतिम सामन्यात टीम इंडियाने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला होता. नवख्या युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी भारताला जिंकवलं होतं. कठीण परिस्थितीत फलंदाजी करत या खेळाडूंनी संघाला संकटातून बाहेर काढलेच शिवाय टीम इंडियाला ऐतहासिक विजय मिळवून दिला होता.

याच ऐताहसिक घटनेला काल १३ जुलै रोजी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या ऐतहासिक विजयाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

या विजयानंतर कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्ट काढून हवेत फिरवला होता. ही घटना सर्वांनाच माहिती आहे. मात्र, सचिन तेंडूलकरने युवी आणि कैफ यांच्याविषयीचा आणखी एक विशेष प्रसंगाचा खुलासा केला आहे. सचिनने त्याच्या युट्युब चॅनेवलर हा मजेशीर प्रसंग सांगितला आहे. 

सचिन म्हणाला की, हा सामना जिंकून दिल्यानंतर सर्वजण प्रचंड खूष होते. संपूर्ण ड्रेसिंग रुमध्ये जल्लोष सुरु झाला होता. थोड्यावेळानंतर युवी आणि कैफ माझ्याकडे आले आणि विचारलं, पाजी आमचा परफॉर्मन्स तर शानदार राहिला. पण याहून वेगळं आणि मोठं आम्ही अजून काय करु शकतो. त्यानंतर सचिन त्या दोघांना म्हणाला, अरे यार तुम्ही दोघांनी देशाला एक मालिका जिंकून दिली आहे. यापेक्षा मोठं काय असू शकते. हे असेच खेळत राहा एवढंच भारतीय क्रिकेट साठी चांगले राहिल". 

फायनलमध्ये काय घडलं-

क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या फायनलमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिक आणि निक नाइट यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडून दमदार सुरुवात केली. निक नाइट १४ धावा करून निघून गेला. ट्रेस्कोथिक मात्र, तिथेच पाय उभा राहिला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नासिर हुसेनने शानदार फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत १८५ धावांची भागीदारी केली. ट्रेस्कोथिक १०९ आणि हुसेन ११५ धावांवर बाद झाले.

याशिवाय मधल्या फळीतील फलंदाज अँड्र्यू फ्लिंटॉफने तुफानी फलंदाजी करताना ३२ चेंडूत ४० धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंड संघाने निर्धारित ५० षटकात ५ गडी गमावून ३२५ धावा केल्या होत्या. भारताकडून झहीर खानने सर्वाधिक ३ तर आशिष नेहरा आणि अनिल कुंबळे यांना १-१  विकेट मिळाली.

३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी पहिल्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. सौरव गांगुली ६० धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिनेश मोंगियाला फार काही करता आले नाही आणि तो ९ धावा करून बाद झाला. त्यामुळे विरेंद्र सेहवागवरही दबाव वाढला आणि तो ४५ धावांवर बाद झाला. यादरम्यान इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताचे १४६ धावांवर ५ गडी बाद केले. टीम इंडियाचे बहुतांश ओळखले जाणारे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. 

इंग्लंड हा फायनल सामना आरामात जिंकेल असे काही काळ वाटत होते. पण ६ आणि ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युवराज आणि मोहम्मद कैफ इतिहास रचतील, हे कुणाच्या मनात देखील आलेले नसेल. या दोन्ही फलंदाजांनी १२१ धावांची भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले.

युवराज ६९ धावांची यादगार खेळी करुन बाद झाला. त्याने या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. तर मोहम्मद कैफने ८७ धावांची नाबाद खेळी खेळत टीम इंडियाला ऐतहासिक विजय मिळवून दिला. भारताने तीन चेंडू बाकी असताना ८ बाद ३२६ धावा करत फायनल सामना खिशात घातला. या सामन्यात नाबाद ८७ धावांची खेळी करणाऱ्या कैफला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत आपला टी-शर्ट काढून हवेत उडवला.

WhatsApp channel