मराठी बातम्या  /  क्रीडा  /  NZ vs ENG Test Match : बझबॉलची कमाल, ब्रेंडन मॅक्युलम-बेन स्टोक्सनं बदललं कसोटी क्रिकेट

NZ vs ENG Test Match : बझबॉलची कमाल, ब्रेंडन मॅक्युलम-बेन स्टोक्सनं बदललं कसोटी क्रिकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 19, 2023 10:53 AM IST

New Zealand vs England test match : कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडची बझबॉल रणनीती खूप यशस्वी ठरली आहे. या रणनीतीअंतर्गत इंग्लिश संघाने आतापर्यंत १० कसोटी सामने जिंकले आहेत.

NZ vs ENG Test Match
NZ vs ENG Test Match

England Bazball Strategy : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला गेला. हा सामना इंग्लंडने २६७ धावांनी जिंकला. यासह इंग्लंडला किवी भूमीवर १५ वर्षांनंतर पहिला कसोटी विजय नोंदवण्यात यश आले. संपूर्ण संघाने इंग्लंडला पहिला सामना जिंकण्यास मदत केली. संघातील सर्व खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली. तर जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी गोलंदाजीत कमाल केली.

इंग्लंड पहिला डाव - ३२५/९ घोषित (बेन डकेत ८४, हॅरी ब्रुक ८९)

न्यूझीलंड पहिला डाव - सर्वबाद ३०६ धावा (टॉम ब्लंडेल १३८)

इंग्लंड दुसरा डाव- सर्वबाद ३७४ (जो रुट ५७ हॅरी ब्रुक ५४)

न्यूझीलंड दुसरा डाव- १२६ धावांत गारद (डॅरील मिळेल ५७)

इंग्लंडने गेल्या वर्षभरापासून कसोटी क्रिकेटमध्ये बझबॉलची रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे त्यांना भरपूर यश मिळाले आहे. बेन स्टोक्स कर्णधार आणि ब्रेंडन मॅक्युलम मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघात हा आमूलाग्र बदल झाला आहे.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली बझबॉलची रणनीती स्वीकारल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. गेल्या वर्षी अॅशेस मालिकेव्यतिरिक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर जो रूटला कर्णधारपदावरून तर ख्रिस सिल्व्हरवुडला मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले होते. या दोघांना त्यांच्या पदावरून काढून टाकल्यानंतर, ईसीबीने बेन स्टोक्सची कर्णधारपदी आणि ब्रेंडन मॅक्क्युलमची कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.

त्यानंतर इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान फलंदाजीच्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली. कसोटीत फलंदाज प्रामुख्याने संथ फलंदाजी करतात. पण गेल्या काही महिन्यांत इंग्लंडने हा समज बदलला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने फलंदाजीची परंपरा इंग्लंडने सुरू केली. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये भरघोस यश मिळाले आहे.

बझबॉल इफेक्ट

इंग्लंडने बझबॉल रणनीती अंतर्गत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लिश संघाने सलग ४ कसोटी सामने जिंकले आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ११ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी १० कसोटी जिंकल्या आणि फक्त एकच सामना गमावला. इंग्लिश संघ ऑगस्ट २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्सवर शेवटची कसोटी हरला होता. त्याचबरोबर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. हे सर्व त्याच्या बझबॉल रणनीतीमुळे शक्य झाले.

WhatsApp channel