Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या क्वार्टर फायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा ४-६,६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. मंगळवारी (२१ जानेवारी) झालेल्या या सामन्यात जोकोविचला पहिल्या सेटमध्ये ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर ३७ वर्षीय स्टार खेळाडूने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकून सामना जिंकला.
या विजयासह जोकोविचने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत झ्वेरेव्हने जागतिक क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ७-६ (१), ७-६ (०), २-६, ६-१ असा पराभव केला. हा सामना २४ जानेवारीला होणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९९व्या विजयासह जोकोविचने विक्रमी २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. त्याने आपल्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या अल्काराझचा पराभव करून १२व्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये आपले स्थान पक्के केले.
जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत २४ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत, त्यापैकी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन सर्वाधिक १० वेळा जिंकली आहे. जोकोविचने ७ वेळा विम्बल्डनचे विजेतेपदही जिंकले आहे. त्याच्या नावावर ४ यूएस ओपन आणि ३ फ्रेंच ओपनची विजेतेपदे आहेत.
अल्काराझने कधीही ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले नाही. गेल्या वर्षीही त्याला ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पण गेल्या वर्षीच त्याने जोकोविचला हरवून दुसऱ्यांदा विम्बल्डन जिंकले होते. तो फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचा प्रत्येकी एकदा चॅम्पियन बनला आहे. पण तो अद्याप ऑस्ट्रेलियन ओपन जिंकू शकलेला नाही.
संबंधित बातम्या