नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजला ब गटात ठेवण्यात आले होते. येथे त्याने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवले.
दरम्यान, थेट फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी ८४ मिटर लांब भाला फेकणे, गरजेचे होते. नीरजसह पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही ८६.५९ मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
या मोसमात नीरज चोप्राचा सर्वोत्तम थ्रो ८८.३६ मीटर होता, जो त्याने दोहा डायमंड लीग २०२४ मध्ये केला होता. म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पात्रता फेरीत ८९.३४ मीटर अंतर कापून त्याने या मोसमातील सर्वोत्तम थ्रोमध्ये सुधारणा केली आहे.
पात्रता फेरीतील दुसरा भारतीय ॲथलीट किशोर जेना बद्दल बोलायचे तर, पात्रता फेरीतील त्याचा सर्वोत्तम थ्रो ८०.७३ मीटर होताे, त्याला फायनल गाठता आली नाही.
पात्रता फेरीत दोन्ही गट एकत्र बघितले तर नीरज चोप्रा आघाडीवर राहिला. त्याने ८९.३४ मीटर अंतर कापून प्रथम स्थान मिळविले आणि त्यानंतर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.६३ मीटर अंतरावर भालाफेक केली. जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसरा राहिला, त्याने ८७.७६ मीटर अंतर कापले. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम ८६.५९ मीटर अंतरासह चौथ्या स्थानावर राहिला.
भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी किमान १२ खेळाडू पात्र ठरतात. पात्रता फेरीत एकूण ७ खेळाडूंनी ८४ मीटरचा टप्पा पार करून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या ७ खेळाडूंनंतर सर्वोत्तम थ्रो करणाऱ्या ५ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. नीरज चोप्रा आता सुवर्णपदकासाठी ८ ऑगस्टला होणाऱ्या अंतिम फेरीत ॲक्शनमध्ये दिसणार आहे.