नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या १४ दिवसांनंतर पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक केली होती. आता लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने ८९.४९ मीटर भालाफेक करून स्वताच विक्रम मोडला. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला.
मात्र, आपल्या सर्वोत्तम थ्रोनंतरही नीरज लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.६१ मीटर अंतरावर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. अँडरसन पीटर्सने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले होते, तर नीरजने दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले होते.
लुसाने डायमंड लीगच्या शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्तम क्रमांक पटकावला. पहिल्या थ्रोमध्ये नीरजने ८२.१० मीटर अंतरावर भालाफेक केली होती.
यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८३.२१ मीटरचे अंतर पार केले. त्यानंतर तिसऱ्या थ्रोमध्ये तो केवळ ८३.१३ मीटर आणि चौथ्या थ्रोमध्ये तो केवळ ८२.३४ मीटर अंतर कापू शकला. यानंतर नीरजच्या पाचव्या थ्रोमध्ये थोडी सुधारणा झाली आणि त्याने ८५.५८ मीटर अंतर कापले. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने ८९.४९ मीटर अंतरावर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली.
नीरज चोप्राला पुन्हा एकदा कारकिर्दीत ९० मीटरचा टप्पा स्पर्श करता आला नाही. नीरज अनेक दिवसांपासून ९० मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आजतागायत त्याला यश आलेले नाही.
नीरजने २०२२ च्या स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो केला, जिथे त्याने ८९.९४ मीटर अंतर कापले. आता नीरज आपल्या कारकिर्दीत ९० मीटरचा टप्पा कधी स्पर्श करू शकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि, कंबरेच्या समस्या असूनही नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये भाग घेतला.