पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ भारतासाठी खूप छान होते. या पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण २९ पदके जिंकली, ज्यात ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
अशा स्थितीत, आपण येथे भारताला ७वे सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नवदीप सिंग याच्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
आपण पॅरालिम्पिकमध्ये आयएएस अधिकारी, आयआयटी पदवीधर आणि पीएचडी लोकांना भारतासाठी पदकं जिंकताना पाहिले आहे. मात्र आता या यादीत इनकम टॅक्स इन्स्पेक्टरचेही नाव जोडले गेले आहे.
होय, भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पॅरा ॲथलीट नवदीप सिंग आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. त्याची पोस्टिंग सध्या बेंगळुरू येथे सुरू आहे.
नवदीपचा जन्म एका जाट तोमर मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तो हरियाणातील पानिपतचा रहिवासी आहे. त्याचे वडील शेतकरी असून त्यांची स्वतःची दूध डेअरी आहे.
२३ वर्षीय नवदीप सिंगची उंची कमी होती. त्याची उंची ४ फूट ४ इंच आहे. उंची कमी असल्याने त्याला लोक चिडवायचे. यामुळे तो अनेकदा चिडायचा. मात्र, त्याने कधी हार मानली नाही. नवदीपने ॲथलेटिक्सची आवड कायम ठेवली. नवदीपने दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वरा कॉलेजमधून बीए हिंदी (HONS) चे शिक्षण घेतले आहे.
नवदीपच्या रक्तात खेळ नेहमीच राहिला आहे. त्याचे वडील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहेत. नवदीपने २०१७ मध्ये आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सिंगने एकूण ५ सुवर्णपदके राष्ट्रीय स्तरावर जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याला यश मिळाले आहे. केवळ पॅरालिम्पिकच नाही तर नवदीपने वर्ल्ड ग्रांप्री २०२१ मध्ये सुवर्णपदक आणि २०२४ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.