Namo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह १५० पैलवानांनी दाखवला दम-namo kusti mahakumbh wrestling event at jamner kusti sikander shaikh vijay choudhary girish mahajan pm modi ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Namo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह १५० पैलवानांनी दाखवला दम

Namo kusti Mahakunbh : जामनेरमध्ये उसळला कुस्तीप्रेमींचा जनसागर, सिंकदर शेख, विजय चौधरीसह १५० पैलवानांनी दाखवला दम

Feb 12, 2024 05:55 PM IST

Namo kusti Mahakunbh Jamner : नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

namo kusti mahakumbh
namo kusti mahakumbh

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा जयघोष करत खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. जामनेर येथे रविवारी (११ फेब्रुवारी) भारतातील रथी-महारथींची कुस्ती स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Sikandar Shaikh), भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक पैलवानांच्या कुस्तींचा थरार चाहत्यांनी अनुभवला.

नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा हा मंत्र भारतातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कुस्ती महाकुंभात खानदेशवासियांनी सोलापूरचा सिकंदर शेख, सायगावचा विजय चौधरी आणि पंजाबच्या प्रीतपाल यांंसारख्या दिग्गज कुस्तीपटूंच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला.

खानदेशवासियांनी सात तास अनुभवला कुस्तीचा थरार

लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत तब्बल सात तास चाललेल्या या कुस्ती दंगलमध्ये सोलापूरचा सिकंदर शेखने जम्मू काश्मीरच्या बिनिया मिनला छडी टांग लावत अस्मान दाखविले. या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे आखाड्यात उतरले होते.

तर सायगावच्या विजय चौधरी विरुद्ध मुस्तफा खान या अटीतटीच्या लढतीत मुस्तफाला विजयने घुटना डावावर चितपट केले. यावेळी संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहून आपल्या भागातील खेळाडूचा जयघोष केला. यावेळी पैलवान विजय चौधरीने कुस्ती जिंकल्यानंतर त्याने आयोजक गिरीष महाजन यांनाच खांद्यावर घेऊन आपला आनंद व्यक्त केला.

Namo kusti Mahakunbh Jamner
Namo kusti Mahakunbh Jamner

१५० पेक्षा अधिक पैलवानांच्या कुस्ती रंगल्या

कुस्ती महाकुंभात प्रेक्षकांनी एकापेक्षा एक लढतींचा थरार अनुभवला. पंजाबच्या प्रितपालने दिल्लीच्या संती कुमारला भारली या डावावर अवघ्या २ मिनिटात चितपट केले.

यानंतर असाच जोरदार खेळ माऊली कोकाटेने करून दाखवला. त्याने उत्तर भारतातील तगडा पैलवान अजय गुज्जरला टांग डावावर चीतपट करून प्रेक्षकांची मने जिंकली.

यानंतर प्रकाश बनकर वि. भूपिंदर सिंह ही कुस्ती बराच वेळ चालली त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. हरयाणाच्या कृष्णकुमारने पंजाबच्या हॅप्पी सिंगला चितपट केले. बाला रफिक शेखने पंजाबच्या मनप्रीतला पोकळ घिस्सा डावावर धूळ चारली.

माऊली जमदाडे आणि जतींदर सिंह यांच्यातील संघर्षही संपता संपत नव्हता. दोघेही तोडीस तोड असल्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

यानंतर बाबर पैलवानवर मोनू खुराणाने मात केली. सत्येन्द्र मलिकने काका जम्मूला चितपट केले. महाराष्ट्राच्या समीर शेखने कलवा गुज्जरला हरवले तर महेंद्र गायकवाडने मनजीत खत्रीला अस्मान दाखवले.

Namo kusti Mahakunbh Jamner
Namo kusti Mahakunbh Jamner

'नमो कुस्ती महाकुंभ' पट्टासह लाखोंची बक्षिसे

कमलजित धुमचडीने गुरजन्नतला हरवण्याची किमया साधली. विलास डोईफोडने प्रेक्षणीय संघर्षात प्रवीण भोलाला चितपट करून प्रेक्षकांची मने जिंकली. पंजाबच्या कमल कुमारने मध्यप्रदेशच्या रेहान खानला पराभूत केले.

या मैदानात १५० मल्लांनी आपल्या खेळाचे प्रदशर्न करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या सर्व विजेत्या पैलवानांना मंत्री गिरीष महाजन यांनी १५ गदा, मानाचा 'नमो कुस्ती महाकुंभ' चा पट्टा आणि लाखोंचे बक्षिसे देऊन गौरविले.

या मैदासाठी ६ स्क्रीन व ५० हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच खासबाग स्टेडियमसारखा आखाडा बांधण्यात आला होता. प्रत्येक प्रेक्षकाला बसून कुस्तीचा थरार अनुभवता यावा म्हणून भव्य स्टेडियमची निर्मिती केली होती.

Whats_app_banner
विभाग