जामनेरमध्ये रंगणार ‘नमो कुस्ती महाकुंभ’, व्यसनमुक्तीचा मंत्र देण्यासाठी देशातील दिग्गज पैलवान येणार
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  जामनेरमध्ये रंगणार ‘नमो कुस्ती महाकुंभ’, व्यसनमुक्तीचा मंत्र देण्यासाठी देशातील दिग्गज पैलवान येणार

जामनेरमध्ये रंगणार ‘नमो कुस्ती महाकुंभ’, व्यसनमुक्तीचा मंत्र देण्यासाठी देशातील दिग्गज पैलवान येणार

Jan 29, 2024 11:54 AM IST

Namo Kunsti Maha Kumbh Jamner : स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, कर्नाटक येथील पैलवान आपला दम दाखवतील.

namo kunsti maha kumbh
namo kunsti maha kumbh (AFP)

आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी काम करणार आहे. त्यासाठी जामनेरमध्ये एका आगळ्यावेगळ्या कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

कुस्तीच्या माध्यमातून व्यसन मुक्तीचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगावच्या जामनेर येथे 'नमो कुस्ती महाकुंभ' नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा, या देशातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा येत्या ११ फेब्रुवारीला रंगणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, कर्नाटक येथील पैलवान आपला दम दाखवतील. या दंगलीचे विशेष आकर्षण म्हणजे विश्वविजेता, अर्जुन पुरस्कार विजेता, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी या स्पर्धांचे सारेच दिग्गज पैलवान सहभागी होणार आहेत. 

एकाच मंचावर इतके दिग्गज खेळाडू खेळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या दंगलच्या निमित्ताने जामनेरमध्ये कुस्तीप्रेमींना एक अद्भुत दंगल अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान, या कुस्ती महाकुंभाविषयी बोलताना स्पर्धेचे आयोजक आणि मंत्री गिरीष महाजन म्हणाले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हा महाकुंभ आम्ही आयोजित करत आहोत. श्री रामाच्या कृपेने तरुण पिढी व्यसनमुक्त व सशक्त व्हावी, हाच या कुस्ती दंगलमागचा उद्देश आहे. 

तसेच, खानदेशमधे एवढी मोठी कुस्ती दंगल आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. खानदेशवासियांना भारतातील दिग्गज पैलवान पाहता येतील. या कुस्ती महाकुंभनिमित्त देशातील नामांकित पैलवान जामनेरला येणार असून देश विदेशातील कुस्तीप्रेमीसुद्धा आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दंगलीचे आयोजनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल, असेही महाजन म्हणाले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या