मराठी बातम्या  /  क्रीडा  /  TNPL 2022: मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकचा जयघोष, विजयची कुल रिअ‍ॅक्शन व्हायरल

TNPL 2022: मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकचा जयघोष, विजयची कुल रिअ‍ॅक्शन व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 26, 2022 06:41 PM IST

तामिळनाडू प्रीमियर लीगमधील (TNPL 2022) एका सामन्यादरम्यान विजय सीमारेषेवर उभा होता. त्यानंतर प्रेक्षक गॅलरीतून डीके-डीकेचा आवाज येऊ लागला. मात्र, विजयने यावर नाराज न होता संयमाने हे प्रकरण हाताळले आहे.

TNPL 2022
TNPL 2022

सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग सुरु आहे. या लीग दरम्यान क्रिकेटपटू मुरली विजय (murali vijay) याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुरली विजय समोर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या (dinesh karthik) नावाचा जयघोष केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विजयची पत्नी निकिता वंजारा ही दिनेश कार्तिकची पहिली पत्नी आहे. विजयसोबतच्या अफेअरनंतर कार्तिक आणि निकिताचा घटस्फोट झाला. पुढे निकिताने विजयसोबत लग्न केले. या घटनेमुळे प्रेक्षकांनी सामन्यादरम्यान विजयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, विजयने यावर न चिडता कुल प्रतिक्रिया दिली. या कुल प्रतिक्रियेने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

वास्तविक, विजय तामिळनाडू प्रीमियर लीगच्या एका सामन्यादरम्यान सीमारेषेवर उभा होता. त्यानंतर प्रेक्षक गॅलरीतून डीके-डीकेचा आवाज येऊ लागला. मात्र, विजयने यावर नाराज न होता हे प्रकरण अत्यंत संयमाने हाताळले. कार्तिकचे नाव ऐकताच विजय प्रेक्षकांकडे वळला आणि हात जोडून त्यांना असे न करण्याचे आवाहन केले. या दरम्यान त्याचे हावभावात संयमी आणि हृदयस्पर्शी होते.

विजयने टीएनपीएलमध्ये या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. रुबी त्रिची वॉरियर्सकडून खेळताना त्याने नेल्लई रॉयल किंग्सविरुद्ध ६६ चेंडूत १२१ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १२ षटकार ठोकले होते. मात्र, विजयचा संघ लीगमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. ७ सामन्यांनंतर रुबी वॉरियर्सचे फक्त ४ गुण आहेत. त्याचा संघ अंतिम चार संघामध्ये स्थान मिळवू शकला नाही.

विजय, निकिता आणि कार्तिकच्या कनेक्शनबद्दल सांगायचे तर, कार्तिकने २००७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकितासोबत लग्न केले. मात्र, काही काळानंतर कार्तिकच्या पत्नीचे मुरली विजयसोबत अफेअर सुरू झाले. जेव्हा निकिताने कार्तिकला याची माहिती दिली तेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम कार्तिकच्या फॉर्मवरही झाला. मात्र, नंतर कार्तिकने स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले. त्याचवेळी विजय आणि निकिता यांनीही लग्नगाठ बांधली.

कार्तिक सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तेथे तो भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे. कार्तिकने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आणि टी-२० विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून त्याचे स्थान जवळपास निश्चित केले आहे.

WhatsApp channel