मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Knee surgery : धोनीच्या गुडघ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, पंतचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनीच केले माहीवर उपचार

MS Dhoni Knee surgery : धोनीच्या गुडघ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, पंतचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनीच केले माहीवर उपचार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 01, 2023 06:43 PM IST

ms dhoni knee surgery : धोनी बुधवारी (३१ मे) मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. गुरुवारी सकाळी ८ वाजता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले.

ms dhoni successful knee surgery
ms dhoni successful knee surgery

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर गुरुवारी (१ जून) शस्त्रक्रिया करण्यात आली. आयपीएल 2023 मध्ये धोनी गुडघ्याच्या समस्येशी झुंजताना दिसला होता. आयपीएल जिंकल्यानंतर ४८ तासांच्या आत त्याने मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि शस्त्रक्रिया करून घेतली. धोनीच्या गुडघ्यांवर डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी सर्जरी केली. डॉ. दिनशॉ परडीवाला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवरदेखील उपचार केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी बुधवारी (३१ मे) मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्या गुडघ्यावर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले.

डॉ. दिनशॉ परडीवाला यांंनी केली धोनीवर सर्जरी

डॉ. दिनशॉ परडीवाला स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्सचे तज्ज्ञ तसेच हॉस्पिटलमधील स्पोर्ट्स मेडिसिनचे संचालक आहेत. ते दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवरही उपचार करत आहेत. परडीवाला यांनी २०१९ मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचेही ऑपरेशन केले होते.

मुंबईला जाण्यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजमेंटशी याबाबत चर्चा केली होती. यानंतर फ्रँचायझीने त्यांचे टीम फिजिशियन डॉ मधु थोट्टापिली यांना धोनीसोबत मुंबईला पाठवले. याआधी बुधवारी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. आयपीएलदरम्यान धोनी डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. तो प्रत्येक सामन्यात खास पट्टी बांधून मैदानात उतरत असे.

धोनीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता

आयपीएलनंतर धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून धोनीच्या चाहत्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले होते. सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट करून महेंद्रसिंग धोनीच्या समर्पणाचे कौतुक केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी जखमी गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे.

WhatsApp channel