मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Six : गुजरातच्या होम ग्राऊंडवर धोनीने धो डाला, हा गगनचुंबी षटकार पाहाच!

MS Dhoni Six : गुजरातच्या होम ग्राऊंडवर धोनीने धो डाला, हा गगनचुंबी षटकार पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2023 12:57 PM IST

MS Dhoni Six video CSK VS GT IPL 2023 : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या जुन्या शैलीत षटकार ठोकला. धोनीचा हा षटकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

MS Dhoni Six video
MS Dhoni Six video

आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामाला दणक्यात सुरुवात झाली. या मोसमातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ गडी गमावून १७८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने ४ चेंडू राखून लक्ष्य गाठले. गुजरातने ५ विकेट्ने हा सामना जिंकला.

दरम्यान यावेळी सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची जुनी शैली पाहायला मिळाली. त्याने अतिशय सुंदर पद्धतीने लांबलचक षटकार मारला.

धोनीची २००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एमएस धोनीने ७ चेंडूत २००च्या स्ट्राईक रेटने नाबाद १४ धावा केल्या. यामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार मारला. डावाच्या शेवटच्या षटकातच धोनीच्या बॅटमधून चौकार आणि षटकार बाहेर पडले. धोनीचा हा उत्तुंग षटकार पाहून चाहत्यांना जुना माही आठवला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने आपल्या शैलीत बॅट स्विंग करताना लेग साइडच्या दिशेने एक लांब षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर त्याने चौकारही मारला.

गुजरात टायटन्ससाठी वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल डावातील शेवटचे षटक टाकत होता. त्याच्या ओव्हरमध्ये त्याने एकूण १३ धावा दिल्या. धोनी आपल्या डावात नाबाद परतला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. गायकवाडच्या या शानदार खेळीत ४ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.

गुजरातने केली चेन्नईविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक

आत्तापर्यंत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलमध्ये एकूण तीन सामने खेळले गेले आहेत, तीनही सामन्यांमध्ये गुजरातने विजय मिळवला आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोघांमध्ये २ सामने झाले, ज्यात गुजरातने दोन्ही जिंकले. आता या मोसमातील पहिल्याच सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा ५ विकेटने पराभव केला.

WhatsApp channel