मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ranji Trophy: चंद्रकांत पंडित यांनी बदललं MP चं नशीब, २३ वर्षांनी स्पप्न पूर्ण

Ranji Trophy: चंद्रकांत पंडित यांनी बदललं MP चं नशीब, २३ वर्षांनी स्पप्न पूर्ण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 04:24 PM IST

चंद्रकांत पंडित (chandrakant pandit) हे २३ वर्षांपूर्वी फायनलमध्ये (ranji trophy final) मध्य प्रदेशचे कर्णधार होते. त्यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. या २३ वर्षांत चंद्रकांत पंडित यांनी मुंबईला तीनदा आणि विदर्भाला दोनदा प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन बनवले आहे.

chandrakant pandit
chandrakant pandit

मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे फायनल जिंकून इतिहास रचला आहे. एमपीने ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबईला पराभूत करून प्रथमच विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबईने मध्य प्रदेशसमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य होते. ते मध्य प्रदेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेश कडून सलामीवीर हिमांशू मंत्री ३७, शुमभ शर्मा ३० तर रजत पाटीदारने ३० धावा केल्या. 

दरम्यान, तुलनेने कमकुवत मानल्या जाणार्‍या मध्य प्रदेश संघाने मुंबईला पराभूत करण्यापूर्वी पंजाब आणि बंगालसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली होती. याआधी मध्य प्रदेशचा संघ १९९८-९९ च्या रणजी ट्रॉफीच्या सीझनमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यानंतर संघाला तब्बल २३ वर्षे या दिवसाची वाट पाहावी लागली.

देशांतर्गत क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हटल्या जाणार्‍या चंद्रकांत पंडित यांचे मध्य प्रदेशच्या विजयात मोठा वाटा आहे,  सोबतच त्यांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. हेच चंद्रकांत पंडित २३ वर्षांपूर्वी फायनलमध्ये मध्य प्रदेशचे कर्णधार होते. त्यावेळी निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. या २३ वर्षांत चंद्रकांत पंडित यांनी मुंबईला तीनदा तर विदर्भाला दोनदा प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन बनवले आहे. त्यांना दोन वर्षांपूर्वीच मध्य प्रदेशने मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. प्रशिक्षक झाल्यानंतर सुरुवातीचे काही निकाल हे त्यांच्या बाजूने लागले नाहीत. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली, पण चंद्रकांत पंडित यांनी आपला मार्ग बदलला नाही.

सामन्यानंतर प्रशिक्षक चंद्रकांत पंडित म्हणाले की, "हा एक अविस्मरणीय क्षण आहे. २३ वर्षांपूर्वी या मैदानावर मी विजेतेपद पटकवाण्यापासून थोडक्यात चुकलो होतो. देवाच्या आशीर्वादाने आम्ही येथे परत आलो. कर्णधार म्हणून मी त्यावेळी विजेतेपदाला मुकलो होतो, पण आज आदित्य श्रीवास्तव आणि टीमने ते करुन दाखवले आहे. मी एका अशाच आव्हानात्मक कामाच्या शोधात होतो. मध्य प्रदेशच्या संघात बरेच तरुण खेळाडू आहेत. त्यामुळे मला त्या राज्यात क्रिकेट विकसित करायचे आहे. मी एमपीकडून खेळायचो, त्यामुळे मला तिथल्या संस्कृतीची चांगली जाण आहे."

सोबतच, "प्रशिक्षक म्हणून माझ्याकडे इतरही ऑफर होत्या, पण मी मध्य प्रदेश निवडला. आदित्य हा एक उत्तम कर्णधार आहे, आम्ही मैदानावर ज्या योजना आणि रणनीतींवर चर्चा केली होती, त्या अंमलात आणण्यात तो यशस्वी ठरला. मी ही ट्रॉफी मध्य प्रदेशला अर्पण करतो. मी सर्व हितचिंतक, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि माधवराव सिंधिया यांचे आभार मानू इच्छितो", असेही चंद्रकांत पंडित म्हणाले.

१०८ धावांचे आव्हान सहज गाठले-

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात ५३६ धावांची मोठी मजल मारली. मध्य प्रदेशकडून यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शानदार शतके झळकावली. तर मुंबईकडून सर्फराज खानने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तसेच, मुंबईला दुसऱ्या डावात केवळ २६९ धावाच करता आल्या.  कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत दुसऱ्या डावात मुंबईचे कंबरडे मोडले. त्यानंतर मिळालेले १०८ धावांचे आव्हान एमपीने शेवटच्या दिवशी सहज पूर्ण केले.

WhatsApp channel