Major League Cricket 2023 : मेजर क्रिकेट लीगमध्ये (MLC 2023) सोमवारी दोन सामने झाले. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली एमआय न्यूयॉर्कने पहिल्या सामन्यात लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जला वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
पोलार्डच्या एमआय न्यूयॉर्कने लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा १०५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचवेळी वॉशिंग्टन फ्रीडमने फाफ डू प्लेसिसच्या टेक्सास सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला.
यानंतर आता मेजर क्रिकेट लीग पॉइंट्स टेबलमध्ये सिएटल ऑर्कास पहिल्या क्रमांकावर आहे. मोईसेस हेनरिक्सच्या नेतृत्वाखालील सिएटल ऑर्कासने २ सामने खेळले आहेत, या संघाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे सिएटल ऑर्कास दोन सामन्यांत ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली एमआय न्यूयॉर्कचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. MI न्यूयॉर्कनेही दोन सामने खेळले आहेत, त्यांचे १ विजय आणि १ पराभवासह २ गुण आहेत. फाफ डु प्लेसिसच्या टेक्सास सुपर किंग्ससह वॉशिंग्टन फ्रीडम, सॅन फ्रान्सिस्को यांचेही २-२ गुण आहेत, परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे टेक्सास सुपर किंग्ज तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सुनील नरेनच्या नेतृत्वाखालील लॉस एंजेलिस नाइट रायडर्ससाठी मोसमाची सुरुवात खूपच खराब झाली. आतापर्यंत लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने २ सामने खेळले आहेत, परंतु दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
त्याच वेळी, मेजर क्रिकेट लीग स्पर्धेचे २ सामने मंगळवारी खेळवले जातील. पहिल्या सामन्यात फाफ डु प्लेसिसच्या टेक्सास सुपर किंग्जचा सामना किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील एमआय न्यूयॉर्कसोबत रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात सुनील नरेनच्या नेतृत्वाखाली लॉस एंजेलिस नाईट रायडर्सचा संघ अॅरॉन फिंचच्या सॅन फ्रान्सिस्कोविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
संबंधित बातम्या