मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Michael Bracewell: करिअरच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक, ५ चेंडूत सामना संपवला

Michael Bracewell: करिअरच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक, ५ चेंडूत सामना संपवला

Jul 21, 2022 05:58 PM IST

न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने टी-२० क्रिकेटमधील करिअरच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही इतिहास रचला होता.

Michael Bracewell
Michael Bracewell

आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात शेवटच्या षटकात पाच षटकार मारून न्यूझीलंडला विजय मिळवून देणाऱ्या मायकेल ब्रेसवेलने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. T20 क्रिकेटमध्ये आपल्या करिअरच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातच हॅट्ट्रिक साधली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पहिल्या सामन्यात त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती, पण दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाजीसाठी आला तेव्हा आयर्लंडला विजयासाठी ४२ चेंडूत ९४ धावांची गरज होती. त्याचवेळी किवी संघ विजयापासून तीन विकेट्स दूर होता.

ब्रेसवेलच्या पहिल्या चेंडूवर चौकार लागला, दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली, पण पुढच्या तीन चेंडूत तीन बळी घेत ब्रेसवेलने इतिहास घडवला आणि सामनाही जिंकला.

हॅट्ट्रिक कशी साधली?

मायकेल ब्रेसवेलने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मार्क अडायरला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले आणि त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. ब्रेसवेलने चेंडूला फ्लाईट दिली होती. त्यामुळे अडायरने पुढे जाऊन मिडविकेटवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि मिडविकेटवर झेलबाद झाला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर मॅकार्टी स्ट्राइकवर होता आणि त्यानेही मिडविकेटवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. त्यालाही यश आले नाही आणि मिडविकेटवर ग्लेन फिलिप्सने त्याचा झेल घेतला. ब्रेसवेलने पाचवा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला. फलंदाज यंगने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. ईश सोधीने त्याचा झेल घेतला. यासह ब्रेसवेलची हॅट्ट्रिक पूर्ण झाली

T20 हॅट्ट्रिक घेणारा तिसरा किवी खेळाडू-

T20I मध्ये हॅट्ट्रिक घेणारा मायकेल ब्रेसवेल हा तिसरा किवी खेळाडू आहे. त्याच्या आधी जेकब ओरमने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू होता. त्याच्यापाठोपाठ टीम साऊदीने २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता मायकेल ब्रेसवेलने आयर्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे.

वनडे सामन्यातही बनवला विक्रम-

मायकेल ब्रेसवेलने याआधी एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने करिअरच्य पहिल्याच सामन्यात नाबाद १२७ धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याच्या संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती. ब्रेसवेलने अखेरच्या षटकात ३ चौकार आणि २ षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना, शेवटच्या षटकातील ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती, ज्यामध्ये पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला. याआधीही न्यूझीलंडने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात २० धावांचे लक्ष्य गाठले होते.

WhatsApp channel