मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI vs UP Highlights : डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईचा पहिला पराभव, युपीने शेवटच्या षटकात मिळवला विजय

MI vs UP Highlights : डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईचा पहिला पराभव, युपीने शेवटच्या षटकात मिळवला विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2023 07:18 PM IST

MI vs UP Highlights: महिला प्रीमियर लीगच्या १५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (MI VS UPW) सामना यूपी वॉरियर्सशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.३ षटकांत लक्ष्य गाठले. दरम्यान, मुंबई संघाने प्लेऑफमधील आपले स्थान आधीच पक्के केले आहे.

MI vs UP Highlights wpl 2023
MI vs UP Highlights wpl 2023

WPL MI vs UPW, Women's Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगच्या १५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पहिला पराभव पत्करावा लागला. रोमहर्षक लढतीत यूपी वॉरियर्सने मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने १९.३ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईने या लीगमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून पाच जिंकले आहेत. हा त्याचा पहिला पराभव आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.

यूपीला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत १३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी सोफी एक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा क्रीजवर होत्या. हेली मॅथ्यूजने १९व्या षटकात ८ धावा दिल्या. यानंतर यूपीला विजयासाठी शेवटच्या षटकात ५ धावांची गरज होती. इस्सी वाँगने पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. सोफी एक्लेस्टोनने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत यूपी संघाला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी, युपीकडून ताहलिया मॅकग्राने ३९ आणि ग्रेस हॅरिसने ३८ धावांची खेळी केली.

त्याचबरोबर यूपीचा ६ सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत यूपीचा संघ अजूनही अबाधित आहे. मुंबई १० गुणांसह अव्वल तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

यूपी आणि मुंबई या दोन्ही संघांना आता प्रत्येकी दोन सामने खेळायचे आहेत. यूपी संघाचा सामना २० मार्च रोजी गुजरात जायंट्स आणि २१ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी होईल. त्याचवेळी मुंबई संघाला २० मार्चला दिल्ली आणि २१ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करायचा आहे.

मुंबईचा डाव

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हेली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. मात्र, अंजली सरवणीने यास्तिकला क्लीन बोल्ड केले. यास्तिकाला सात धावा करता आल्या. यानंतर फॉर्मात असलेली फलंदाज नॅट सीव्हर ब्रंट काही विशेष करू शकली नाही. ती ५ धावा करून एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाली. हेली मॅथ्यूजनेही धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तिची विकेट गमावली. तिला ३० चेंडूत एक चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावा करता आल्या.

कर्णधार हरमनप्रीत कौर २२ चेंडूत २५ धावा करून बाद झाली. अमेलिया केर काही विशेष करू शकली नाही आणि ३ धावा करून बाद झाली. अमनजोत कौर (५), हुमैरा काझी (४), धारा गुर्जर (३) आणि सायका इशाक (००) हेही झटपट बाद झाले. मुंबईच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

यानंतर शेवटी इस्‍सी वाँगने १९ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३२ धावांची तुफानी खेळी केली. २०व्या षटकात मुंबईच्या २ विकेट पडल्या. या षटकात इस्सी वाँग आणि सायका धावबाद झाली. उत्तर प्रदेशकडून सोफी एक्लेस्टोनशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी अंजली सरवणीला एक विकेट मिळाली.

WhatsApp channel