IPL Cricket Score, MI vs RCB Indian Premier League 2023 : IPL 2023 चा ५४वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सनी पराभव करत सहाव्या विजयाची नोंद केली. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. त्याचवेळी आरसीबीसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या. मुंबईने चार गडी गमावून लक्ष्य गाठले.
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ६ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला २०० धावांचे लक्ष्य दिले होते, जे यजमानांनी १७व्या षटकात पूर्ण केले. मुंबईच्या विजयाचा हिरो सूर्यकुमार यादव ठरला. त्याने ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. यादरम्यान सूर्याने ७ चौकार आणि ६ षटकार मारले.
या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
तत्पूर्वी, लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली. इशान किशनने अवघ्या २१ चेंडूंत ४ चौकार आणि षटकारांसह ४२ धावा केल्या. आपल्या झंझावाती खेळीदरम्यान इशानने रोहित शर्मासोबत ५१ धावांची भागीदारी केली. ५व्या षटकात वानिंदू हसरंगाने इशानला यष्टिरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. हसरंगाने त्याच षटकात रोहितलाही एलबीडब्ल्यू केले, त्याला केवळ ७ धावा करता आल्या.
नाणेफेक हारल्यानंतर आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्याची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पाचव्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला (१ धाव) यष्टिरक्षक इशान किशनकडे झेलबाद केले. यानंतर त्याच्या पुढच्या षटकात या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने अनुज रावतलाही तंबूत पाठवले. ६ धावा करणाऱ्या रावतने कॅमेरून ग्रीनकडे कॅच सोपवला.
१६ धावांत दोन विकेट पडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी १२० धावांची धडाकेबाज भागीदारी करून आरसीबीला मजबूत स्थितीत नेले. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. जेसन बेहरेनडॉर्फने मॅक्सवेलला नेहल वढेराकडे झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर काही वेळातच महिपाल लोमरोर (१) आणि फाफ डू प्लेसिसही पॅव्हेलियनमध्ये परतले.
डु प्लेसिसने ४१ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. डू प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, फॉर्ममध्ये नसलेल्या दिनेश कार्तिकने काही जोरदार फटके मारून आरसीबीला २०० धावांच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. कार्तिकने ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. वनिंदू हसरंगा आणि केदार जाधव या दोघांनी १२ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने ३ विकेट घेतल्या.
सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. या दोघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे मुंबई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. १४ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद १५४ आहे.
५२ धावांवर मुंबई इंडियन्सची दुसरी विकेट पडली. वनिंदू हसरंगाने एकाच षटकात इशान किशन आणि रोहित शर्माला बाद केले. रोहितने आठ चेंडूंत सात धावा केल्या. हसरंगाने त्याला पायचीत केले. पॉवरप्ले संपल्यानंतर मुंबईची धावसंख्या दोन बाद ६२ अशी आहे.
५१ धावांवर मुंबई संघाची पहिली विकेट पडली. इशान किशन २१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. वनिंदू हसरंगाने त्याला अनुज रावतकरवी झेलबाद केले. आता सूर्यकुमार यादव रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा गडी गमावून १९९ धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार फाफ डुप्लेसिसने ६५ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. त्यामुळे मुंबईला २०० धावांचे लक्ष्य देण्यात आरसीबी संघ यशस्वी ठरला. दिनेश कार्तिकनेही शेवटच्या षटकांमध्ये झटपट धावा केल्या. डीकेने १८ चेंडूत ३० धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने तीन बळी घेतले. कॅमेरून ग्रीन, ख्रिस जॉर्डन आणि कुमार कार्तिकेय यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१८५ धावांच्या स्कोअरवर आरसीबीची सहावी विकेट पडली. १८ चेंडूत ३० धावा करून दिनेश कार्तिक बाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या चेंडूवर नेहल वढेराने त्याचा झेल टिपला. कार्तिकने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. आता वनिंदू हसरंगा केदार जाधवसोबत क्रीजवर आहे.
आरसीबीचा निम्मा संघ १४६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. फॅफ डुप्लेसिस ४१ चेंडूत ६५ धावा करून बाद झाला आहे. कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर विष्णू विनोदने त्याचा झेल टिपला. आता दिनेश कार्तिक आणि केदार जाधव क्रीजवर आहेत.
RCB ला ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने तिसरा मोठा धक्का बसला. मॅक्सवेलने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकार लगावत ६८ धावांची खेळी केली.
फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. आरसीबीची धावसंख्या १२ षटकांत २ बाद १३१ अशी आहे.
ग्लेन मॅक्सवेलनंतर फाफ डुप्लेसिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. प्लेसिसने ५० धावांचा टप्पा पार करण्यासाठी ३० चेंडूंचा सामना केला.
ग्लेन मॅक्सवेलने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे आरसीबीच्या धावसंख्येने दोन विकेट्सवर १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोघांनी २५ चेंडूत ५० धावा जोडल्या आहेत. या दोघांमधील उत्कृष्ट भागीदारीमुळे आरसीबी संघाने चांगली धावसंख्या गाठली आहे. ७ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या दोन बाद ७२ अशी आहे.
16 धावांवर आरसीबीची दुसरी विकेट पडली. विराट कोहलीनंतर अनुज रावतही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जेसन बेहरेनडॉर्फने त्याला कॅमेरून ग्रीनkjbr झेलबाद केले. अनुजने चार चेंडूत सहा धावा केल्या. तीन षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २० धावा.
आरसीबीची पहिली विकेट दोन धावांवर पडली. विराट कोहली एका धावेवर बाद झाला. त्याला जेस बेहरेनडॉर्फने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विकेटकीपर इशान किशनकरवी झेलबाद केले.
यष्टिरक्षक इशान किशनने त्याचा झेल टिपला. अंपायरने त्याला आधी आऊट दिले नव्हते, पण मुंबईने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे आणि मुंबईत लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. जोफ्रा आर्चर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे, त्याच्या जागी ख्रिस जॉर्डन मुंबई संघात सामील झाला आहे. त्याचवेळी आरसीबीचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. कर्ण शर्माच्या जागी विजयकुमार वैशाखचा संघात समावेश करण्यात आला आहे.