मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs GT IPL : गुजरातचा २७ धावांनी पराभव, राशीद खानची १० षटकारांची तुफानी खेळी व्यर्थ

MI Vs GT IPL : गुजरातचा २७ धावांनी पराभव, राशीद खानची १० षटकारांची तुफानी खेळी व्यर्थ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 12, 2023 11:33 PM IST

MI Vs GT IPL highlights : मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातला विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावाच करू शकला.

MI Vs GT IPL highlights
MI Vs GT IPL highlights

MI Vs GT IPL highlights : आयपील 2023 च्या ५७व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आज (१२ एप्रिल) गुजरात टायटन्सचा २७ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातला विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावाच करू शकला. 

गुजरातकडून राशिद खानने अवघ्या ३२ चेंडूंत नाबाद ७९ धावा केल्या, ज्यात १० षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे ५५ धावांतच पाच गडी तंबूत परतले होते. फॉर्मात असलेले सलामीवीर रिद्धिमान साहा (२) आणि शुभमन गिल (६) यांना आकाश मधवालने बाद केले. त्याचवेळी कर्णधार हार्दिक पांड्याला (४) जेसन बेहरेनडॉर्फने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विजय शंकरने (२९) सहा चौकार मारले, पण अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाने उत्कृष्ट चेंडूवर त्याला बोल्ड केले. यानंतर अभिनव मनोहरला कुमार कार्तिकेयने बोल्ड केले, त्याला फक्त २ धावा करता आल्या.

५ विकेट पडल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी ४५ धावांची भागीदारी केली. आकाश मधवालने डेव्हिड मिलरला बाद करून ही भागीदारी तोडली. मिलरने २६ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. मिलर बाद झाल्यानंतर लगेचच राहुल तेवतियाही पियुष चावलाच्या चेंडूवर बाद झाला.

राशीद खानची झंझावाती फलंदाजी

१०३ धावांवर आठवी विकेट पडल्यानंतर गुजरात टायटन्स संघ १२५ धावाही करू शकणार नाही असे वाटत होते. मात्र अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सला मोठ्या पराभवापासून वाचवले. राशिदने आयपीएल कारकिर्दीत पहिले अर्धशतक झळकावले. राशिद खान आणि अल्झारी जोसेफ (७) यांच्यात नवव्या विकेटसाठी ८८ धावांची नाबाद भागीदारी झाली.

मुंबईचा डाव

मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यांनी ६.१ षटकात ६१ धावांची भागीदारी केली. रोहितने १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. त्याचवेळी इशानने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या. फिरकी गोलंदाज राशिद खानने एकाच षटकात दोन्ही खेळाडूंना बाद केले. रशीदने नेहल वढेरालाही तंबूत पाठवले. त्यामुळे मुंबईची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८८ धावा झाली.

सुर्याची तुफान फटकेबाजी

येथून सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद यांनी ६५ धावांची भागीदारी करत मुंबईला १५० धावांच्या पुढे नेले. विष्णू विनोदने दोन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. विनोद बाद झाल्याचा सूर्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याची झंझावाती फलंदाजी सुरूच राहिली. सूर्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सूर्याने ४९ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या.

WhatsApp channel