मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL Final : मुंबई इंडियन्सने पटकावलं WPL चं पहिलं विजेतेपद, सीव्हर ब्रंटचं झुंजार अर्धशतक

WPL Final : मुंबई इंडियन्सने पटकावलं WPL चं पहिलं विजेतेपद, सीव्हर ब्रंटचं झुंजार अर्धशतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 26, 2023 10:53 PM IST

DC Vs MI WPL Highlights : महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आज संपला आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे.

DC Vs MI WPL final Highlights
DC Vs MI WPL final Highlights

WPL Final, Delhi vs Mumbai Final Women's League 2023 : इंग्लंडची अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. तिने ५५ चेंडूत नाबाद ६० धावांची झुंजार खेळी करून संघाला विजेतेपद पटकावून दिले.

दिल्लीने २० षटकांत ९ विकेट गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला. मुंबई फ्रँचायझीच्या खात्यातील ही सहावी ट्रॉफी आहे. त्यांचा पुरुष संघ आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनला आहे.

नतालीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी २० चेंडूत नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिली. नतालीने याआधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत ३९ चेंडूत ३७ धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने १३ आणि यास्तिका भाटियाने चार धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दिल्लीचा डाव

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर एके काळी त्यांच्या ९ विकेट ७९ धावांत पडल्या होत्या. संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता येणार नाही, असे वाटत होते. तिथून शिखा पांडे आणि राधा यादवने डाव सांभाळला. दोघींनी शेवटच्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. राधाने १२ चेंडूत नाबाद २७ तर शिखाने १७ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एख षटकारही मारला.

या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार मेग लॅनिंग वगळता कोणीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाही. लॅनिंगने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. ती दुर्दैवाने धावबाद झाली. मारिजन कॅपने १८ आणि शेफाली वर्माने ११ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. अमेलिया केरला दोन बळी मिळाले.

WhatsApp channel