मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs LSG Eliminator : आकाश मढवालचे ५ धावांत ५ बळी, लखनौला चिरडत मुंबईची क्वालिफायर-2 मध्ये एन्ट्री

MI Vs LSG Eliminator : आकाश मढवालचे ५ धावांत ५ बळी, लखनौला चिरडत मुंबईची क्वालिफायर-2 मध्ये एन्ट्री

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 24, 2023 11:28 PM IST

IPL 2023 MI Vs LSG Eliminator highlights : IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह रोहित ब्रिगेडने क्वालिफायर-2 सामन्यात आपले स्थान पक्के केले आहे, आता क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे.

LSG vs MI Highlights
LSG vs MI Highlights

IPL Qualifier 2 LSG vs MI 2023 Highlights : लखनौ सुपर जायंट्सचा संघ आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. २४ मे (बुधवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौचा मुंबई इंडियन्सने ८१ धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ १६.१ षटकात १०१  धावांवर आटोपला. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला आकाश मढवाल ठरला. मढवालने अवघ्या ५ धावांत ५ बळी घेतले.

या विजयासह रोहित ब्रिगेडने क्वालिफायर-2 सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे त्यांचा सामना २६ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला भिडणार आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. आकाश मधवालने सलामीवीर प्रेरक मांकडला डावाच्या दुसऱ्याच षटकात हृतिक शोकीनकरवी झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात लखनौ संघाचा इम्पॅक्ट प्लेयर काईल मेयर्सला ख्रिस जॉर्डनने पायचीत केले. दोन विकेट लवकर पडल्यानंतर मार्कस स्टॉइनिस आणि कर्णधार कृणाल पंड्या यांनी ४६ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.

मात्र, या भागीदारीदरम्यान कृणाल (८ धावा, ११ चेंडू) अजिबात टचमध्ये दिसला नाही. फिरकी गोलंदाज पियुष चावलाने टीम डेव्हिडकरवी झेलबाद करून क्रुणालचा डाव संपवला. क्रुणाल बाद झाल्यानंतर आकाश मधवालच्या त्याच षटकात लखनौने लागोपाठ चेंडूंवर विकेट गमावल्या. मधवालने प्रथम आयुष बडोनीला बाद केले, त्यानंतर पुढच्या चेंडूवर निकोलस पूरनला बाद करून मुंबईला मोठे यश मिळवून दिले.

लखनौचे तीन फलंदाज धावबाद

त्यानंतर लखनौ संघाने मार्कस स्टॉइनिसची विकेट गमावली. स्टॉइनिसने २७ चेंडूंत ४० धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. स्टोईनीस धावबाद झाला. लखनौला येथून जिंकणे अशक्य बनले. स्टोईनीसनंतर के गौतम आणि रवी बिश्नोईही धावबाद झाले. 

मुंबईतर्फे आकाश मधवालने ३.३ षटकांत ५ धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी पियुष चावला आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मुंबई इंडियन्सचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली आणि चौथ्याच षटकातच कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितला अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हकने आयुष बडोनीच्या हाती झेलबाद केले. रोहितने १० चेंडूत ११ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार आहे. यानंतर यश ठाकूरच्या चेंडूवर ईशान किशनची (१५) विकेटही मुंबईने गमावली.

३८ धावांत दोन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ६६ धावांची तुफानी भागीदारी करून मुंबईला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. नवीन-उल-हकच्या षटकात दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. सूर्याने २० चेंडूंत दोन चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्याचवेळी ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. ग्रीनने आपल्या खेळीत ६ चौकार आणि एक षटकार लगावला.

येथून तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांच्यात ४३ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे मुंबईला पुन्हा गती मिळाली. वर्माने २२ चेंडूत २६ धावा केल्या, तर डेव्हिडच्या बॅटमधून १३ धावा आल्या. शेवटच्या षटकांत नेहल वढेराने २३ धावा करत मुंबईला १८२ धावांपर्यंत नेले. वढेराने १२ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि २ षटकार आहेत. लखनौकडून नवीन-उल-हकने ४ तर यश ठाकूरने तीन खेळाडूंना बाद केले. 

WhatsApp channel