मराठी बातम्या  /  क्रीडा  /  विराटसाठी रोहितला जिंकावेच लागेल, प्ले ऑफसाठी दिल्ली आज मुंबईशी भिडणार

विराटसाठी रोहितला जिंकावेच लागेल, प्ले ऑफसाठी दिल्ली आज मुंबईशी भिडणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 21, 2022 11:49 AM IST

बंगळुरुचे १४ सामन्यात १६ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १३ सामन्यात १४ गुण आहेत. बंगळुरु गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.आज दिल्लीचा विजय झाला तर त्यांचेही १६ गुण होतील पण नेट रनरेटच्या आधारावर दिल्ली चौथ्या स्थानावर झेप घेईल.

दोन्ही संघांचे कर्णधार
दोन्ही संघांचे कर्णधार

आयपीएलमधील (IPL) प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज शनिवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (DC) कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावाच लागणार आहे. त्यांचा सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडिन्सशी (MI) होणार आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला (RCB) प्ले ऑफमधले आपले स्थान पक्के करण्यासाठी मुंबईच्या विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे.

बंगळुरुचे १४ सामन्यात १६ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १३ सामन्यात १४ गुण आहेत. बंगळुरु गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.  आज दिल्लीचा विजय झाला तर त्यांचेही १६ गुण होतील पण नेट रनरेटच्या आधारावर दिल्ली चौथ्या स्थानावर झेप घेईल. असे झाले तर बंगळूरु पाचव्या स्थानावर घसरेल आणि स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे विराटच्या बंगळूरुला प्ले ऑफमध्ये पोहोचवण्यासाठी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आज जिंकावे लागणार आहे. 

मुंबईविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीची मदार ही डेव्हिड वॉर्नर तसेच, सध्या चांगल्या फॉर्मात असलेला मिशेल मार्श यांच्यावर असणार आहे. तसेच, कर्णधार रिषभ पंतलाही या सामन्यात जबाबदारीने खेळ करावा लागेल. दिल्लीच्या गोलंदाजीत कुलदीप यादवसह नॉर्खिया, शार्दूल ठाकूर यांना कमाल करावी लागणार आहे. 

मुंबईचा संघ या सामन्यात नव्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. ‘पुढच्या आयपीएल सीझनसाठी आम्हाला नवीन खेळाडूंची चाचपणी करायची आहे, त्यामुळे आम्ही नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छितो'. असे त्यांचा कर्णधार रोहित शर्मा यापूर्वीच म्हणाला आहे. 

दरम्यान,  हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने सर्वप्रथम प्ले ऑफमध्ये आपली जागा निश्चित केली, ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच, शुक्रवारी संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला पाच गड्यांनी धुळ चारली. यामुळे राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर केएल राहुलचा लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता दिल्ली किंवा बंगळूरू यांच्यापैकी प्ले ऑफमधला चौथा संघ कोणता असेल ते आजच्या सामन्याच्या निकालानंतर कळणार आहे. 

संभाव्य संघ-

दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिशेल मार्श,  रिषभ पंत (कॅप्टन), ललित यादव,  रोवमन पॉवेल,  अक्षर पटेल,  शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव,  एनरिज नॉर्खिया,  खलील अहमद.

मुंबई इंडियन्स- इशान किशन, रोहित शर्मा (कॅप्टन),  तिलक वर्मा, डॅनियल सॅम्स,  रमणदीप सिंग,  टीम डेव्हिड,  ट्रिस्टन स्टब्स,  संजय यादव,  जसप्रीत बुमराह,  रिले मेरडिथ, मयंक मार्कंडे.

 

 

 

WhatsApp channel

विभाग