पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अशाप्रकारे मनू भाकरला पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे.
आता या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या शनिवारी (३ ऑगस्ट) होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिला आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
त्याचबरोबर आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मात्र, शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये मनू भाकर कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
मनू भाकरने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत २ पदके जिंकली आहेत. मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. यानंतर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत मनूसोबत सरबज्योत सिंगचाही तिच्या संघात समावेश होता. स्वातंत्र्यानंतर, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू आहे.
मुन भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या वोंहो आणि ओ ये जिन यांचा पराभव केला. मनु भाकरला टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये निराश व्हावे लागले होते. त्यावेळी मनू भाकरच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता. पण यावेळी मनू भाकरचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. आतापर्यंत तिने २ पदके जिंकली आहेत. तिसरे पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे.