Manu Bhaker To D Gukesh Khel Ratna : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकर आणि विश्व बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने दोन कांस्यपदके जिंकली होती, त्यापैकी एक तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जिंकले होते. तर दुसरे पदक मिश्र १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जिंकले.
डी गुकेशने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता. गुकेशने चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. गुकेश वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जगज्जेता झाला.
पुरुष भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. याशिवाय हरमनप्रीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचाही भाग होता.
उंच उडीपटू प्रवीण कुमार याने २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय प्रवीण कुमारने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. प्रवीण कुमार याचा डावा पाय जन्मापासूनच लहान आहे.
यावेळी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यापैकी १७ पॅरा अॅथलीट होते.
अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघाचे सदस्य हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या