राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली. तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब अशा उपांत्य लढती रंगतील.
पुरुषांच्या अ गटात विजय क्लब- लायन्स स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन - जय भारत यांच्यात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघर्ष होईल.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाने कामगार महर्षी आंबेकर यांच्या स्मृतीनिमित्त मुंबईतील ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ४३-७ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली.
विश्वशांती संघानेही जिजामाता स्पोर्ट्स क्लबवर ४३-१० अशी सहज मात करीत अंतिम चार संघात आपले नाव पक्के केले. आता डॉ.शिरोडकर वि. स्वामी समर्थ आणि विश्वशांती वि. शिवशक्ती अशा तुल्यबळ उपांत्य लढती रंगतील.
पुरूषांच्या व्यावसायिक गटात आरबीएससीने ओमकार, आर्यन ढवळे आणि सागर जगताप यांच्या वेगवान चढायांच्या जोरावर गंधेकर इलेक्ट्रिकलचा ४४-२० असा फडशा पाडला. तसेच रिझर्व्ह बँकेनेही ओमकार थोटे आणि संग्राम साळुंखे यांच्या तूफानी चढायांमुळे रुबी कन्स्ट्रक्शनचे आव्हान ३४-२३ असे संपुष्टात आणले.
यानंतर श्री स्वामी समर्थ संघाने सीबीसी संघाचा ३२-१६ असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तर आयकर संघाने बीपीसीएल संघाचा ३७-३२ असा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला.
पुरूषांच्या स्थानिक गटात विजय क्लबसमोर अंकूर स्पोर्ट्स क्लबचे काहीएक चालले नाही. विजय क्लबने एकतर्फी सामन्यात ४२-२८ असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली.
लायन्स स्पोर्ट्स क्लबने हर्ष मोरे आणि राज आचार्य यांच्या चढायांच्या बळावर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचा २८-२६ असा पराभव केला. गुड मॉर्निंगकडून साहिल राणे आणि शार्दुल पाटील यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. तसेच जय भारत संघाने उपांत्य फेरीत धडक मारताना बंड्या मारुती संघाचे आव्हान २९-१७ असे मोडीत काढले.
अध्यक्ष आमदार सचिन अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धां उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या आयोजनाखाली पार पडत आहेत. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे.
संबंधित बातम्या