महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेचा अंतिम सामना आज (२ फेब्रुवारी) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि ६७ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. पण यंदाही तो फायनलमध्ये पराभूत झाला.
गायकवाड आणि मोहोळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. यात मोहोळ याने बाजी मारली. मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि पृथ्वीराजला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली.
मोहोळच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
तत्पूर्वी, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपांत्य सामन्यात जोरदार राडा झाला. वास्तविक, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांची कॉलर पकडली आणि लाथ मारली. त्याला त्याचा पराभव मान्य नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या वादात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
मॅट विभागामधून नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडत होता. दोघांमध्ये चुसर रंगली असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाल्याचे पंचांनी जाहीर केला, पण राक्षेला हे मान्य नव्हते आणि त्याने राडा घातला.
शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी राग अनावर झालेल्या शिवराजने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथही मारली.
संबंधित बातम्या