MI Vs LSG Highlights : लखनौला चिरडत मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये, आकाश मढवालचे ५ धावांत ५ बळी-lsg vs mi ipl live score eliminator match lucknow super giants vs mumbai indians match scorecard updates ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MI Vs LSG Highlights : लखनौला चिरडत मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये, आकाश मढवालचे ५ धावांत ५ बळी

MI Vs LSG Highlights : लखनौला चिरडत मुंबई इंडियन्स क्वालिफायर-2 मध्ये, आकाश मढवालचे ५ धावांत ५ बळी

May 24, 2023 11:39 PM IST

IPL 2023 चा एलिमिनेटर सामना लखनौ (LSG) आणि मुंबई (MI) यांच्यात झाला. या सामन्यात लखनौचा ८१ धावांनी पराभव झाला. लखनौचा संघ आता आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

MI Vs LSG Eliminator Live Score
MI Vs LSG Eliminator Live Score

IPL Qualifier 2 LSG vs MI 2023 Highlights : IPL 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १८१ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनौचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला.

MI Vs LSG Eliminator Score updates

मुंबईचा धमाकेदार विजय

लखनौ सुपर जायंट्सचा संघ आयपीएल 2023 च्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. २४ मे (बुधवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनौचा मुंबई इंडियन्सने ८१ धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ १६.१ षटकात १०१ धावांवर आटोपला. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला आकाश मढवाल ठरला. मढवालने अवघ्या ५ धावांत ५ बळी घेतले.

या विजयासह रोहित ब्रिगेडने क्वालिफायर-2 सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे, जिथे त्यांचा सामना २६ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला भिडणार आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. आकाश मधवालने सलामीवीर प्रेरक मांकडला डावाच्या दुसऱ्याच षटकात हृतिक शोकीनकरवी झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात लखनौ संघाचा इम्पॅक्ट प्लेयर काईल मेयर्सला ख्रिस जॉर्डनने पायचीत केले. दोन विकेट लवकर पडल्यानंतर मार्कस स्टॉइनिस आणि कर्णधार कृणाल पंड्या यांनी ४६ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला.

मात्र, या भागीदारीदरम्यान कृणाल (८ धावा, ११ चेंडू) अजिबात टचमध्ये दिसला नाही. फिरकी गोलंदाज पियुष चावलाने टीम डेव्हिडकरवी झेलबाद करून क्रुणालचा डाव संपवला. क्रुणाल बाद झाल्यानंतर आकाश मधवालच्या त्याच षटकात लखनौने लागोपाठ चेंडूंवर विकेट गमावल्या. मधवालने प्रथम आयुष बडोनीला बाद केले, त्यानंतर पुढच्या चेंडूवर निकोलस पूरनला बाद करून मुंबईला मोठे यश मिळवून दिले.

लखनौचे तीन फलंदाज धावबाद

त्यानंतर लखनौ संघाने मार्कस स्टॉइनिसची विकेट गमावली. स्टॉइनिसने २७ चेंडूंत ४० धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. स्टोईनीस धावबाद झाला. लखनौला येथून जिंकणे अशक्य बनले. स्टोईनीसनंतर के गौतम आणि रवी बिश्नोईही धावबाद झाले.

मुंबईतर्फे आकाश मधवालने ३.३ षटकांत ५ धावा देत ५ बळी घेतले. त्याचवेळी पियुष चावला आणि ख्रिस जॉर्डन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मुंबई इंडियन्सचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली आणि चौथ्याच षटकातच कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितला अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हकने आयुष बडोनीच्या हाती झेलबाद केले. रोहितने १० चेंडूत ११ धावा केल्या, ज्यात एक चौकार आणि एक षटकार आहे. यानंतर यश ठाकूरच्या चेंडूवर ईशान किशनची (१५) विकेटही मुंबईने गमावली.

३८ धावांत दोन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी तिसर्‍या विकेटसाठी ६६ धावांची तुफानी भागीदारी करून मुंबईला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. नवीन-उल-हकच्या षटकात दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. सूर्याने २० चेंडूंत दोन चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्याचवेळी ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. ग्रीनने आपल्या खेळीत ६ चौकार आणि एक षटकार लगावला.

येथून तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांच्यात ४३ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे मुंबईला पुन्हा गती मिळाली. वर्माने २२ चेंडूत २६ धावा केल्या, तर डेव्हिडच्या बॅटमधून १३ धावा आल्या. शेवटच्या षटकांत नेहल वढेराने २३ धावा करत मुंबईला १८२ धावांपर्यंत नेले. वढेराने १२ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि २ षटकार आहेत. लखनौकडून नवीन-उल-हकने ४ तर यश ठाकूरने तीन खेळाडूंना बाद केले.

LSG vs MI Live Score : लखनौचे ९ फलंदाज तंबूत

१०० धावांच्या स्कोअरवर लखनौच्या नऊ विकेट पडल्या आहेत. दीपक हुडाच्या रूपाने लखनौला नववा धक्का बसला. १३ चेंडूत १५ धावा करून तो धावबाद झाला. आता मोहसीन खान आणि नवीन उल हक क्रीजवर आहेत. मुंबईचा विजय जवळपास निश्चित आहे.

LSG vs MI Live Score : लखनौला ६वा धक्का

८९ धावांच्या स्कोअरवर लखनौची सहावी विकेट पडली. त्यामुळे लखनौच्या विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत. मार्कस स्टॉइनिस २७ चेंडूत ४० धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. धावत असताना त्याचा सहकारी फलंदाज दीपक हुडाशी टक्कर होऊन तो धावबाद झाला. आता दीपक हुड्डासोबत कृष्णप्पा गौतम क्रीजवर आहे. लखनौची धावसंख्या १२ षटकांत सहा बाद ९० अशी आहे.

LSG vs MI Live Score: लखनौचे दोन्ही सलामीवीर बाद

लखनौ सुपर जायंट्सचे दोन्ही सलामीवीर २३ धावांवर बाद झाले. काइल मेयर्सच्या रूपाने लखनौला आणखी एक धक्का बसला.

LSG Vs MI Live Score : मुंबईच्या १८२ धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या उपयुक्त खेळींनी मुंबईची धावसंख्या १८० धावांच्या पुढे नेली. लखनौकडून नवीन-उल-हकने ४ बळी घेत मुंबईला २०० धावांचा टप्पा पार करण्यापासून रोखले. यश ठाकूरला तीन आणि मोहसीन खानला एक विकेट मिळाली.

चेन्नईच्या खेळपट्टीवर ही धावसंख्या छोटी नाही, पण दुसऱ्या डावात दव पडल्यास लखनौच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जाईल.

LSG Vs MI Live Score : टीम डेव्हिड बाद

१४८ धावांवर मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम डेव्हिडच्या रूपाने मुंबईला पाचवा धक्का बसला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. यश ठाकूरच्या फुल टॉस बॉलवर दीपक हुडाने त्याचा झेल टिपला.

LSG Vs MI Live Score : तिलक-डेव्हिडने डाव सांभाळला

तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी चांगली भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. तिलक मोठे फटके मारत असताना डेव्हिड सावध खेळत आहे. मुंबईची धावसंख्या १६ षटकांत ४ बाद १४१ अशी आहे.

LSG Vs MI Live Score : कॅमेरून ग्रीन बाद

मुंबई इंडियन्सची चौथी विकेट १०५ धावांच्या स्कोअरवर पडली. सूर्यकुमार यादवपाठोपाठ कॅमेरून ग्रीनही बाद झाला आहे. नवीन-उल-हकने एकाच षटकात दोन्ही फलंदाजांना बाद करून मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर आणले आहे. ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याच्या खेळीत सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

LSG Vs MI Live Score : सूर्यकुमार यादव बाद

१०४ धावांवर मुंबईची तिसरी विकेट पडली. सूर्यकुमार यादव २० चेंडूत ३३ धावा करून बाद झाला आहे. नवीन-उल-हकने त्याला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. आता टिळक वर्मा कॅमेरून ग्रीनसोबत क्रीजवर आहेत. मुंबईची धावसंख्या ११ षटकांत ४ बाद १०५  अशी आहे.

LSG Vs MI Live Score : इशान किशन बाद

३८ धावांवर मुंबई संघाची दुसरी विकेट पडली. रोहित शर्मानंतर इशान किशनही बाद झाला आहे. त्याने १२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. यश ठाकूरने त्याला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. पाच षटकांनंतर मुंबईची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावा आहे. आता कॅमेरून ग्रीन आणि सुर्या  क्रीजवर आहेत.

LSG Vs MI Live Score : रोहित शर्मा बाद

३० धावांवर मुंबई इंडियन्सची पहिली विकेट पडली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा १० चेंडूत ११ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. नवीन-उल-हकने त्याला आयुष बडोनीकरवी झेलबाद केले. आता कॅमेरून ग्रीन इशान किशनसोबत क्रीजवर आहे. चार षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ३८ अशी आहे.

LSG Vs MI Live Score : दोन्ही संघ

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

LSG Vs MI Live Score : मुंबईची प्रथम फलंदाजी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. कुमार कार्तिकेयच्या जागी हृतिक शोकीनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

प्लेऑफमध्ये मुंबईचा रेकॉर्ड उत्कृष्ट

प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मुंबईने प्लेऑफमध्ये १८ सामने खेळले असून १२ जिंकले आहेत. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या हंगामातही या संघाला सलग तीन सामने जिंकून सहाव्यांदा ट्रॉफी जिंकायची आहे.

लखनौविरुद्ध मुंबई कधीही जिंकलेली नाही

मुंबई संघाला आतापर्यंत आयपीएलमध्ये लखनौला पराभूत करता आलेले नाही. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले असून सर्व सामने लखनौने जिंकले आहेत.