मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG VS DC Highlights : लखनौच्या मार्क वुडचे ५ विकेट, दिल्लीचा लाजिरवाणा पराभव

LSG VS DC Highlights : लखनौच्या मार्क वुडचे ५ विकेट, दिल्लीचा लाजिरवाणा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2023 07:03 PM IST

LSG VS DC Live Score : आयपीएलच्या १६व्या हंगामातील तिसरा सामना आज (१ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. लखनौने त्यांच्या घरच्या मैदानावर दिल्लीवर ५० धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

LSG VS DC Live Score
LSG VS DC Live Score

Lucknow vs Delhi IPL 2023 : आयपीएलच्या १६व्या हंगामातील तिसरा सामना आज (२ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना लखनौने ५० धावांनी जिंकला या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लखनौने २० षटकांत ६ बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४३ धावाच करू शकला.

LSG VS DC Score updates

लखनौचा शानदार विजय

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या १६व्या हंगामात धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी पराभव केला. लखनौचा आयपीएलमधील दिल्लीविरुद्धचा हा सलग तिसरा विजय आहे. आतापर्यंत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नाही. लखनौने गेल्या मोसमात सलग दोन सामन्यांत दिल्लीचा पराभव केला.

१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ २० षटकांत केवळ १४३ धावाच करू शकला. त्यांच्यासाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने ४८ चेंडूत ५६ धावा केल्या. यादरम्यान वॉर्नरने ७ चौकार मारले. वॉर्नरला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही.

वॉर्नरशिवाय रिले रुसोने २० चेंडूत ३० धावा, अक्षर पटेलने ११ चेंडूत १६ धावा, पृथ्वी शॉने ९ चेंडूत १२ धावा केल्या. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

LSG VS DC Live Score : डेव्हिड वॉर्नर बाद 

आवेश खानने लखनौ सुपर जायंट्सला सर्वात मोठे यश मिळवून दिले. त्याने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नर ४८ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. 

LSG VS DC Live Score : दिल्लीला तिसरा धक्का

या सामन्यात मार्क वुडची किलर गोलंदाजी सुरूच आहे. त्याच्या दुसऱ्या आणि डावाच्या सातव्या षटकात त्याने लखनौ सुपरजायंट्सला तिसरे यश मिळवून दिले. वुडने सर्फराज खानला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले.  दिल्लीने आठ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ५३ धावा केल्या आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर ३१ आणि रिले रुसो तीन धावा करुन खेळत आहे.

LSG VS DC Live Score : मार्क वुडचे दोन चेंडूत दोन विकेट्स

लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने कहर केला आहे. त्याने डावाच्या पाचव्या आणि त्याच्या पहिल्याच षटकात सलग दोन चेंडूंत दोन बळी घेतले. त्याने तिसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ आणि चौथ्या चेंडूवर मिचेल मार्शला क्लीन बोल्ड केले. पृथ्वीने नऊ चेंडूत १२ धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. पृथ्वीने वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी २७ चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. त्याच्या पाठोपाठ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श बाद झाला

LSG VS DC Live Score : लखनौच्या १९३ धावा

लखनौ सुपर जायंट्सने धमाकेदार फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य मिळाले. लखनौकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने ३८ चेंडूत सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि ७ षटकार मारले.

निकोलस पूरनने २१ चेंडूत झटपट ३६ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. आयुष बडोनीने शेवटच्या षटकात सात चेंडूत १८ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन लांबलचक षटकार मारले.

दीपक हुडा १७ , मार्कस स्टोइनिस १२ आणि केएल राहुल आठ धावा करून बाद झाले. कृणाल पंड्या १३ चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला. इम्पॅक्ट प्लेयर कृष्णप्पा गौतमने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, त्याने एका चेंडूत ६ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

LSG VS DC Live Score : निकोलस पूरन पॅव्हेलियनमध्ये 

लखनौ सुपर जायंट्सला निकोलस पूरनच्या रूपाने पाचवा धक्का बसला. १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. खलील अहमदच्या चेंडूवर पूरनने पृथ्वी शॉकडे झेल सोपवला.

LSG VS DC Live Score : अक्षरने काइल मेयर्सला बाद केले

अक्षर पटेलने १२व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सला मोठे यश मिळवून दिले. त्याने तिसऱ्या चेंडूवर काइल मेयर्सला क्लीन बोल्ड केले. मेयर्स ३८ चेंडूत ७३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. मेयर्स बाद झाल्यानंतर मार्कस स्टॉइनिस क्रीजवर आला.

LSG VS DC Live Score : काइल मेयर्सने झळकावलेले अर्धशतक

काइल मेयर्सने लखनौ सुपरजायंट्ससाठी पहिले अर्धशतक झळकावले. त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मेयर्सने कुलदीप यादवला षटकार ठोकला. त्याने या षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले.

LSG VS DC Live Score : लखनौ सुपर जायंट्सचा डाव सुरू

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सचा डाव सुरू झाला आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज काइल मेयर्स कर्णधार केएल राहुलसोबत मैदानात उतरला आहे. दिल्लीसाठी खलील अहमदने गोलंदाजीची सुरुवात केली.

LSG VS DC Live Score : दोन्ही संघ

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विेकेटकीपर), आयुष बदोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसो, सरफराज खान (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

LSG VS DC Live Score : लखनौचा संघ प्रथम फलंदाजी करेल

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp channel