
अर्जेंटिना संघ फुटबॉल विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी १९७८ आणि १९८६ मध्येही अर्जेंटिना चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरली होता.
अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
मेस्सीचा फोटो व्हायरल
दरम्यान, लियोनेल मेस्सीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने हे फोटो काहीवेळापूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना अवघ्या तीन तासातंच २७ मिलियन्सहून लोकांनी लाईक केले आहे. हा एक नवा विक्रमच आहे. या फोटोंमध्ये मेस्सी वर्ल्डकप ट्रॉफी आपल्या शेजारी ठेवून झोपलेला दिसत आहे. या फोटोला त्याने गुड मॉर्निंग असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर संघातील तसेच इतर देशाच्या संघातील खेळाडूंनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो चाहते विमानतळाबाहेर
विमान लँड झाल्यावर सर्वप्रथम संघाचा कर्णधार लियोनेल मेस्सी ट्रॉफीसह विमानातून बाहेर आला. त्याच्यासोबत संघाचा कोच लियोनेल स्कालोनी होता. त्यानंतर एक-एक खेळाडू विमानातून बाहेर आले. यावेळी लाखो चाहत्यांनी मेस्सीच्या संघाचे संस्मरणीय स्वागत केले. आपल्या वर्ल्ड चॅम्पियन संघाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे, काही काळापासून सतत आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अर्जेंटिनाच्या नागरिकांसाठी हा विश्वचषक विजय संजीवनी ठरला आहे. जगातील सर्वाधिक महागाई असलेल्या देशांमध्ये अर्जेंटिनाचा समावेश आहे. अर्जेंटिनात दहापैकी चार लोक गरिब आहेत.
संबंधित बातम्या
